छत्रपती संभाजीनगर – वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेची (नीट) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूर पर्यंत आल्याचे बुधवारीच स्पष्ट झाल्यानंतर गुरुवारी तपास यंत्रणांनी एका सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातून लातूरचे नीट कनेक्शन अधिक गडद झाले आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या (सीबीआय) तपासातून नवनवीन धागेदोरे समोर येत आहेत. तपासादरम्यान लातूरमधील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाचे पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे हिच्याशी संपर्क असल्याचे उघड झाल्याचे समोर येत आहे. दोघांमधील संपर्काचा उलगडा मोबाईल फोनवरील संपर्काच्या तपशीलातून पुढे आल्याचे सांगितले जात आहे. संबंधित सेवानिवृत्त प्राध्यापक नीट पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेत सक्रिय होता का ? मोबाईल तपासात काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का, याचीही चौकशी सुरू असून, त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सीबीआयचे पथक आता लातूरमधील विविध महाविद्यालये तसेच खासगी ट्युशन परिसरातील कोणत्या व्यक्तींशी संबंधित प्राध्यापकाचे संबंध होते का, याची तपासणी करत आहे. यापूर्वी काही खासगी क्लास चालकांचीही चौकशी करण्यात आली होती.

घरामधून महत्त्वाचे साहित्य जप्त

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे दोन पथके लातूरमध्ये दाखल असून, नीट प्रकरणामध्ये संबंधित सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती घेतली असता काही कागदपत्रे आणि मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे लातूरच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, तपास आणखी व्यापक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अत्यंत गोपनीय पद्धतीने झडती

सीबीआयच्या पथकाने अतिशय गुप्त पद्धतीने मध्यरात्री सेवानिवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेऊन घराची झाडाझडती घेतली. हे पथक लातूरमध्येच थांबले की तपासानंतर निघून गेले याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.