छत्रपती संभाजीनगर : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात अटकेत असणारा ‘आरसीसी’ शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर वर्गातील विद्यार्थ्यांवर ‘एम्स’ मध्ये प्रवेश मिळावा म्हणून तांब्याच्या भांड्यातून अंब्याच्या पानाने मंतरलेले पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर शिंपडत असल्याचे एका चलचित्रणात दिसून येत आहे. विज्ञान शिकविणाऱ्या प्राध्यापकाकडून अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचे दिसून आल्याने मोटेगावकराच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.
मोटेगावकर त्याच्या शिकवणी वर्गात ‘तुम्ही ‘एम्स’मध्ये लागणार,’ असा दावा करत एका बाकावर चढून मुलांच्या डोक्यावर पाणी शिंपडत असल्याचे दिसून येत आहे. मोटेगावकर हेही मंत्रतंत्रावर विश्वास ठेवत होते का, असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकर याची भूमिका सीबीआयकडून त्याच्या विरोधातील पुरावे गोळा केले जात आहे. लातूरमधील काही डॉक्टर, पालक आणि विद्यार्थ्यांचीही चौकशी सुरू आहे.
हजारो कोटी रुपयांची उलाढाल करणारा शिवराज मोटेगावकर हा डॉक्टरांच्या मुलांसाठी स्वतंत्र शिकवणी घेत असे. त्या तुकडीस ‘फोटॉन’ असे नाव देण्यात आले होते. डॉक्टर किती नामांकित यावरुन त्याचे शुल्क ठरत असे. उत्तम रसायनशास्त्र शिकवणाऱ्या या व्यक्तीला वैज्ञानिक जाणीव नव्हतीच, हेही नव्या व्हिडिओमुळे समोर आले आहे.
शिकवणी वर्ग परिसर बंद
लातूरच्या शिकवणी परिसरातील सर्व शिकवण्या, हॉटेल आणि इतर व्यवसाय तातडीने बंद करण्याचा आदेश जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील यांनी शुक्रवारी दिले. हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत ठरल्याचा उल्लेख आदेशात आहे. मात्र, जिल्हाधिकारी भारत बस्टेवाड यांनी अशा प्रकारचा आदेश दिलेला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील व्यवसायांच्या बाबतीत प्रशासनामध्ये संभ्रम असल्याचे दिसून आले.
आदेशात संभ्रम असल्याने कारवाई होईल की नाही, ही शंका उपस्थित होत असताना शनिवारी या भागातील सर्व व्यवसाय बंद करण्यात आले. व्यावसायिकांनी संंबंधित आदेशच समोर चिकटवल्याचे दिसून आले. त्यामुळे लातूरमध्ये शिकवणी वर्ग भागात नव-नवे गोंधळ निर्माण होत आहेत. रविवारच्या सुट्टीमुळे हा भाग आज बंद होता.
दरम्यान मोटेगावकर याने कोणत्या डॉक्टरांना प्रश्नपत्रिका पुरवल्या या तपासातील एक डॉक्टर माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याने सीबीआयच्या हाती बरेच काही लागले असल्याचा दावा केला जात आहे. लातूरच्या शैक्षणिक गुणवत्तेचा डंका देशभर वाजत असे. पेपरफुटी प्रकरणामुळे आणि मोटेगावकरांच्या विविध व्हिडिओमुळे आता लातूरच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
