छत्रपती संभाजीनगर : ‘ नीट ’ पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या ‘आरसीसी’ शिकवणी वर्गाचे प्रमूख शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. रविवारी दुपारी २ वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरू होती. दोन दिवसापूर्वी त्यांच्या शिकवणी वर्गाच्या कार्यालयातून अनेक प्रकारचे कागदपत्रे ‘ सीबीआय’ ने ताब्यात घेतले. रविवारी रात्रीही त्यांची चौकशी सुरू होती.
एका बाजूला ‘नीट’ परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचे समजल्यानंतर या शिकवणीवर्गातून ४२ प्रश्न ‘ नीट ’ परीक्षेत आल्याची तक्रार एका पालकाने लातूर पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असतानाच ‘ सीबीआयचे ’ पथक लातूरमध्ये दाखल झाले.
त्यांनी मोटेगावकर यांची चौकशी सुरू केली. मात्र, कोणत्या शिकवणी चालकाच्या विरोधात कारवाई करण्यात आली हे जाहीर केले नव्हते. ‘सीबीआय’ने कोणत्या शिकवणी वर्ग चालकाची चौकशी सुरू केली याची माहिती अधिकृतपणे दिली नव्हती. शनिवारी विद्यार्थ्यांचा ‘ रसायनशास्त्रा’ चा वर्ग घेतल्याचा दावा मोटेगावकर यांनी केला होता.
दोन दिवसाच्या चौकशीनंतर सीबीआयने मोटेगावकर यांना ताब्यात घेतले. पेपरफुटी प्रकरणात अटकेत असणारे सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही कुलकर्णी हेही रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. मोटेगावकर हेही रसायनशास्त्र शिकवतात. हा सहसंबंध लक्षात घेऊन सीबआयचे अधिकारी तपास करत आहेत.
लातूरमध्ये वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे बॅन्ड लावून कौतुक करण्यापासून ते लातूर शिक्षणाच्या प्रारुपाचे ‘फॅक्टरी’मध्ये रुपांतर केल्याची जाहिरात मोटेगावकर करत. लातूरमध्ये किमान ३० – ३२ शिवकवणीवर्ग सुरू आहेत. अन्य कोणत्या शिकवणी वर्गाकडून ‘ फॅक्टरी ’ अशी जाहिरात केली जात नसे. मोटेगावकर यांच्या शिकवणीवर्गात आता उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शिक्षक अध्यापाने काम करतात.
शनिवारी आरसीसी या शिकवणी वर्गात ‘सीबीआय’चे पथक दाखल झाले होते. या कारवाईदरम्यान अनेक कागदपत्रे, संगणक आणि मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत. पुण्यातील सीबीआय कार्यालयात त्यांना ताब्यात घेण्यात आले. नीट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा आणि मोटेगावकर यांचा पेपरफुटी प्रकरणात कसा संबंध हे अद्यापि स्पष्ट झालेले नाही. मात्र, पेपरफुटी प्रकरणात नांदेड आणि लातूरमध्ये मोठ्या घडामोडी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
