छत्रपती संभाजीनगर : नीट पेपर फुटीनंतर आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आता केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळेल व ती एक कोटी रुपयांपर्यंत असू शकेल. हे न्यायालयीन प्रक्रियेनंतर ठरले आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारचे एक पथक भेटण्यासाठी अभिजीत दिपके संभाजीनगरला येऊन गेले होते. या अनुषंगाने चार – पाच बैठका झाल्यानंतर तोडगा निघाला. त्यामुळे ५ सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन आता होणार नाही, असे सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सोमवारी जाहीर केले. हा मोठा दुसरा विजय असल्याचे दिपके म्हणाले.

आर्थिक मदत देण्याच्या भूमिकेमुळे काही अडचणीत असणाऱ्या पालकांना दिलासा मिळेल. गेलेल्या व्यक्तीला तर परत आणता येणार नाही, पण किमान मदत मिळाल्याने या कुटुंबातील अन्य मुलांचे शिक्षण करण्याचे बळ पालकांना मिळेल अशी प्रतिक्रिया दिपके यांनी दिली.

नीट पेपरफुटीनंतर शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात सुनावणीमध्ये पार पडला. हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकारचे एक पथक दिपके यांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर गुन्हे मागे घेणे आणि मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे केंद्र सरकारने ठरवले. सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. हा निर्णय दुसरा मोठा विजय असल्याचे दिपके यांनी म्हटले आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विजय होताच. पण या कुटुंबियांना मदत मिळणे तेवढेच गरजेचे होते, असे दिपके म्हणाले.

आमदार फोडायला पैसे तर मग मदत कमी कशासाठी ?

या कुटुंबीयांना एक कोटी रुपयेच मदत मिळेल. जर तुमच्याकडे सरकार पाडायला, आमदार फोडायला पैसे आहेत तर मग मदतही एक कोटी रुपयांची असेल असेच वाटते आहे, यात कोणतीही कंजुषी केली जाऊ नये, असा टोलाही दिपके यांनी लगावला. ही रक्कम ९० दिवसाच्या आत देण्याच्या कालमर्यादेचेही दिपके यांनी स्वागत केले. आम्ही न्यायालयाचेही आभार मानतो असे सांगत दिपके यांनी काही मृत विद्यार्थ्यांची नावे घेऊन कुटुंबीयांची आर्थिक स्थिती कशी वाईट आहे, हे सांगितले.