सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद : चार वर्षांत विविध परीक्षेसाठी त्याने १२० अर्ज केले. परीक्षा शुल्क व परीक्षेसाठी केलेल्या प्रवासावर तब्बल अडीच लाख रुपये खर्च केले. कधी बसस्थानकावर झोपला तर कधी वडापाव खाऊन परीक्षा दिली. कोणत्या पदांसाठी परीक्षा दिल्या. याची त्याच्याकडे डायरी आहे. त्यात प्रत्येक परीक्षेची नोंद आहे. पण त्या परीक्षांच्या निकालात आपले नाव का नाही, याची उत्तरे त्याच्याकडे नाहीत. नितीन मोहिते असे त्याचे नाव. आता तो वैतागला आहे. पोटापाण्यासाठी सकाळी घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवतो. तो म्हणतो, ‘एक तरी परीक्षा नीट घेता येईल का सरकारला?’ पेपरफुटीपूर्वीच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा तपशील नितीनला पाठ आहे. तलाठी परीक्षेत बीड जिल्ह्यातील आष्टी व पाटोद्याची १५० जणांची निवड कशी होते? आता टीईटी, आरोग्य परीक्षेतील घोटाळे समोर आले आहेत. प्रत्येक परीक्षेत घोळच घोळ असतात. प्रगत महाराष्ट्र सरकार त्यांची स्वत:ची भरतीही पारदर्शकपणे करू शकत नाही, हे गेल्या सात वर्षांपासूनचे दुखणे आहे. पण उत्तर कोणीच शोधत नाही. त्यामुळे नितीन मोहितेसारखे तरुण वैतागले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आता पुन्हा पुढे ढकलल्यानंतर अभ्यासिकांमधून अनेक जण बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. नितीनने दिलेल्या अनेक परीक्षांचे निकाल अद्याप बाहेर आलेले नाहीत. काही परीक्षांमध्ये तो अपयशी देखील ठरला. पण तो म्हणतो, कोणत्या परीक्षेत किती गुण मिळाले हे सांगण्याचेही सौजन्य कोणी दाखवत नाही. नितीन मोहितेची आई धुणी-भांडी करून उपजीविका भागवते. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी बाहेरगावाहून औरंगाबाद शहरात आलेल्या मुलांची आता नव्याने कुचंबणा सुरू झाली आहे. करोनाकाळात गावीच शेती करण्यासाठी गेलेल्या तरुणांची संख्याही अधिक असून त्यातील अनेक जण परतले नाहीत. पुन्हा एकदा अभ्यासिकेत मानेवर खडा ठेवून अभ्यास करणारे मोजकेच जण परतले होते. आता पुन्हा तेही ‘चला गावाकडे’ याच मानसिकतेत आले आहेत.  नितीन मोहिते म्हणाला,‘ एक परीक्षेचा अर्ज २५० रुपये बँकेचे चलन, पोस्टाचा खर्च असा पैसा तर जातोच. पण होणारा मनस्ताप मोठा आहे. पेपर फोडणाऱ्यांवर तर कारवाई करावी. नुसते भाषण करण्याऐवजी परीक्षेची व्यवस्था नीट करायला हवी. पण एक मात्र नक्की की प्रगत महाराष्ट्रात पारदर्शी भरती करणार नाहीत.’