मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणी आमच्याशी संपर्क साधला नाही व आम्हीही कोणाशी संपर्क साधला नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे बोलताना सांगितले.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांची मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले. खोत हेही या वेळी उपस्थित होते. परंतु त्यांनी श्रोत्याची भूमिकाच निभावली, मात्र एका प्रश्नाच्या उत्तरावर खोत यांनी सरकारच्या बाजूने भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला असता ‘ही मंत्रिपदी वर्णी लागण्यापूर्वीची सारवासारव दिसत असून, सदाभाऊ आताच मंत्र्यांसारखे बोलत आहेत’ असे लक्षात आणून देताच खासदार शेट्टी आणि सदाभाऊ दोघेही खळाळून हसले! शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार अधिक परिणामकारक हवे, असे शेट्टी म्हणाले होते. हा धागा पकडून ‘सदाभाऊंना कोणत्या खात्याचा कारभार मिळाला तर ते शेतकऱ्यांसाठी परिणामकारक ठरेल?’ या प्रश्नावरही शेट्टी यांनी हास्य करून उत्तर टाळले. परंतु ‘शेतकऱ्यांसाठी परिणामकारक काम होत नसेल तर त्यांना मंत्रिमंडळातून परत बोलावू’ असे मात्र सदाभाऊंना उद्देशून शेट्टी म्हणाले.
आधीच विलंब झालेल्या वार्ताहर बैठकीस शेट्टी येऊन बसले. त्यानंतर उशिराने सदाभाऊ आले. सदाभाऊंचे आगमन झाल्यावर शेट्टी यांनी, ‘आता त्यांच्या उशिराने येण्याची सवय आपणास करून घ्यावी लागणार आहे’ अशी टिप्पणी केली. वार्ताहर बैठकीत आणि शासकीय विश्रामगृहावर जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत एकूण वातावरण होते खोत यांच्या संभाव्य मंत्रिपदाचेच. सदाभाऊही काहीशा रिलॅक्स मूडमध्ये आणि हसतमुख होते.
‘त्यांची’ सर्रास वीजचोरी चालते,
थकबाकीदार शेतकरीच गुन्हेगार!
मंगळवारी रात्री जालना येथील शासकीय विश्रामगृहावर मुक्कामी असलेले खासदार शेट्टी सकाळी पोलीस वसाहत परिसरात फिरण्यास गेले होते. त्या वेळी पोलिसांच्या शासकीय घरात आकडे टाकून वीजपुरवठा घेतल्याचे आपणास दिसले, असे सांगून त्यांनी या संदर्भात केलेले चित्रण वार्ताहरांना दाखविले. पोलिसांची आकडे टाकून सर्रास वीजचोरी चालते. मात्र, वीजबिल थकले तर शेतकऱ्यांस मात्र गुन्हेगाराची वागणूक दिली जाते, असा आरोप त्यांनी केला.