करोनाविरोधाच्या लढय़ात संक्रमण सुरू झाले तेव्हा राज्यात केवळ ३ विषाणू निदान व संशोधन प्रयोगशाळा (व्हीआरडीएल) होत्या. गेल्या शंभर दिवसांत आजपर्यंत ८५ प्रयोगशाळा सुरू केल्याने राज्यात सर्वाधिक तपासण्या होऊ शकल्या. प्रयोगशाळांची संख्या लवकरच १०० होईल. या सर्व व्यापात काम करणाऱ्यांचे वेतन थकणार नाहीत, याची काळजीही घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यत करोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे. सुरुवातीला मृत्युदर अधिक होता. जिल्ह्यत सर्व आघाडय़ांवरील उपाययोजनेतून समाधानकारक साथनियंत्रणाचे काम झाल्याने मृत्युदर कमी झाला आहे. साथ किती वाढले याची कल्पना नाही. पण वाढत्या रुग्णसंख्येचा वेध घेऊन आवश्यक उपाययोजनेची तयारी सोबत करोनाबाधितांच्या  संपर्कातील जवळील व्यक्तींच्या तपासणीला प्राधान्य द्या, असेही देशमुख म्हणाले. विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्ह्यच्या करोनाच्या स्थितीचा मंत्री अमित देशमुख यांनी आढावा घेतल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी दुपारी पत्रकार बैठकीत बोलताना ते म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील घाटी रुग्णालयातील बहुउपचार केंद्राच्या मनुष्यबळाचा प्रश्न लवकर मार्गी लागेल. तसेच राज्य कर्करोग संस्थेचे रखडलेले विस्तारीकरण महिनाभरात सुरू होईल. वैद्यकीय अधिकारी यांची पदे कायम करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून रुग्णालयांत उपचारासाठी आवश्यक ती साधनसामग्री व यंत्रसामग्री उपलब्ध आहे. हा लढा रुग्णालयात नाही रुग्णालयाबाहेरही आहे. त्यामुळे सर्वानी मुखपट्टी, हातांची स्वच्छता, अंतर राखणे गरजेचे आहे. इतर आजारांची लागण असल्याने मृत्युदर अधिक असल्याने वयस्क व आजार असलेल्यांनी बाहेर पडू नये, असेही त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, माजी मंत्री अनिल पटेल आदींची उपस्थिती होती