छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजातील तरुणांना पोलिसांवर दबाव आणून खोटय़ा गुन्ह्यांमध्ये अडकण्याचे षडय़ंत्र काही ओबीसी नेत्यांकडून सुरू आहे. त्यांचा मराठा नेत्यांनी एकजूट होऊन बंदोबस्त करावा. मराठा नेत्यांमध्येच ओबीसी नेत्यांना वठणीवर आणण्याची ताकद आहे अन्यथा मराठा नेत्यांच्या मागे समाज राहणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ते येथे उपचार घेत असलेल्या रुग्णालयात माध्यमांशी मंगळवारी सकाळी बोलत होते.
हेही वाचा >>> मराठा आरक्षणाबाबत बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचं मोठं विधान; म्हणाले…




अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करण्याच्या भूमिकेवरून जरांगे पाटील यांनी भुजबळ यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, बीडमध्ये सोमवारी काही ओबीसी नेत्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन भुजबळ यांचे निकटवर्तीय अॅड. सुभाष राऊत यांच्या हॉटेलवर हल्ला केल्याप्रकरणात काही मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनीही या प्रकरणाची माहिती घ्यावी, असे आवाहन केले. ओबीसी समाजातील एक-दोन नेते थयथयाट करत असून, त्यांना मराठा समाजातील गोरगरीब मुलांचे कल्याण होऊ द्यायचे नाही, असा आरोप केला. भुजबळ यांच्या निकटवर्तीयांचे हॉटेल फोडण्यात त्यांच्याच समाजातील काही मंडळींचा हात असून, त्यांच्यातीलच पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याची माहिती आपल्याकडे आल्याचेही जरांगे म्हणाले.