छत्रपती संभाजीनगर – सातारा येथे पुढील वर्षात होऊ घातलेल्या ९९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रविवारी निवड झालेले “पानिपत”कार विश्वास पाटील हे मागील सात वर्षातील तिसरे संमेलनाध्यक्ष ठरले आहेत. तर प्रशासकीय सेवेतील सहावे अधिकारी ठरले आहेत.
यापूर्वी लक्ष्मीकांत देशमुख व भारत सासणे या दोन जिल्हाधिकारीपदावर काम केलेल्या साहित्यिकांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला होता. देशमुख हे बडोदा येथे झालेल्या संमेलनाचे तर सासणे हे २०२२ साली येथे झालेल्या ९६ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते. तर पानिपतकार विश्वास पाटील हे रायगड, ठाणे येथे जिल्हाधिकारी तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
तत्पूर्वी जिल्हाधिकारीपदी नसले तरी प्रशासकीय सेवेत राहिलेले मधू मंगेश कर्णिक, ना. सं. इनामदार, मारोती चितमपल्लींही संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळालेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक असलेले मधू मंगेश कर्णिक १९९० साली रत्नागिरीत आयोजित ६४ व्या, महसुली सेवेत असलेले इनामदार हे १९९७ च्या अहमदनगरमधील ७० व्या संमेलनाचे तर सोलापूर येथील ७९ व्या संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले मारोती चितमपल्ली हे वन विभागात अधिकारी होते, असे साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितले. लक्ष्मीकांत देशमुख व भारत सासणे अध्यक्ष झाले तेव्हा ठाले पाटील हे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते.
संधी हुकलेले
१९८१ सालच्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ आठ मतांनी पराभूत झालेल्या मालती बेडेकर याही प्रशासकीय सेवेत होत्या. अकोला येथील संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मालती बेडेकर यांचा पराभव गो. नी. दांडेकर यांनी केला होता. मालती बेडेकर यांना १९७५ च्या ५१ व्या संमलेनावेळी अध्यक्ष करण्यासाठी यशवंतराव चव्हाण उत्सक होते आणि त्यांच्याकडे प्रस्तावही पाठवला होता, पण त्यांनी नकार देऊन संधी गमावली. तर इतिहासाचे अभ्यासक सेतू माधवराव पगडी हे तत्कालीन औरंगाबादचे जिल्हाधिकारी होते, परंतू त्यांना संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळू शकला नाही, ही एक खंत आहेच, असे सांगत कौतिकराव पाटील यांनी अध्यक्षपदाबाबतचे संदर्भ आणि आठवणी सांगितल्या.
न्यायमूर्ती, कुलगुरूंचाही सन्मान
संमेलनाध्यक्षपदी विराजमान होण्याचा सन्मान दोन न्यायमूर्ती व चार कुलगुरूंनाही लाभला आहे. त्यात पहिले संमेलनाध्यक्ष महादेव गोविंद रानडे व वर्धा येथील ९७ व्या संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर हे दोन न्यायमूर्ती तर डॉ. शंकरराव खरात, दत्तो वामन पोतदार, वि. भि. कोलते व डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे कुलगुरुपदी राहिलेले होते.
