धाराशिव : धाराशिव मतदारसंघांचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी शिवसेना (उबाठा) गटातून शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या चोवीस तासात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली. धाराशिव जिल्ह्याच्या सर्व आघाड्यांची कार्यकारिणी बरखास्त केल्यामुळे शिंदे सेनेतील अंतर्गत घडामोडीला वेग आला आहे. शिंदे सेनेतील अंतर्गत वादाची चुणूक जिल्हा परिषद निवडणूक आणि सत्ता स्थापनेच्या वेळी दिसून आली होती. नवीन कार्यकारणी तयार करताना पक्षप्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
माजी आरोग्य मंत्री आमदार तानाजी सावंत हे धाराशिव जिल्ह्यात शिंदे सेनेचे ‘किंगमेकर ’ असल्याचा दावा त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून केला जात असला तरी त्यांच्या स्वभावमुळे त्यांचे पक्षांतर्गत विरोधकही मोठ्या प्रमाणात आहेत. तेरणा सहकारी कारखाना चालवण्यास घेतल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविषयी विखारी टीका केली होती. कुठपर्यंत आपण बापाचे दुःख सांगून लोकांना भावनिक करणाऱ असा प्रश्न त्यांनी त्यावेळी केला होता. त्याची चित्रफित सध्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. त्यामुळे वरकरणी संघटना मजबूत करण्यासाठी जुनी कार्यकारिणी बरखास्त केल्याचा दावा केला जात असला तरी पक्षानंतर्गत वादाचा ही पहिली घंटा तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
‘मिशन टायगर ’ परिपूर्ण करण्यासाठी आमदार सावंत यांच्यावर खासदार ओम राजेनिंबाळकर यांची मानसिकता घडविण्याची जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, आमदार सावंत यांची भूमिका आणि शिंदे सेनेतील कार्यकारिणी बरखास्तीचा संबंध जोडला जात आहे. त्यामुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. आता बरखास्त केलेली कार्यकारीणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने बरखास्त केली आहे. खासदार राजेनिंबाळकर यांच्या प्रवेशानंतर चोवीस तासातच कार्यकारिणी बरखास्त झाली आहे.
गेल्या काही दिवसापासून धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेत मोठे वाद होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी व निवडणुकीनंतर सत्तास्थापन करताना भारतीय जनता पार्टीची सलगी असणारा गट व तानाजी सावंत यांचा गट असा वाद शिवसेनेत पाहायळा मिळाला. धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना ही भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधली असा आरोप अनेकवेळा शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी केला होता. एवढेच नाही तर काही मुख्य पदाधिकारी यांची हकालपट्टी करा अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक व आमदार तानाजी सावंत यांच्याकडे केली होती. खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या प्रवेशाला काही तास होतात न होतात तोच धाराशिव जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्याचे पत्र निघाले आहे. यात शिवसेना युवासेना, महिला आघाडीसह कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ती मिळू शकली नाही.
प्रतिक्रिया
२०२२ पासून मी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे ) गटाचा जिल्हा प्रमुख आहे. माझा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे नवीन कार्यकारिणी नेमणे गरजेचे असल्याने सध्याची कार्यकारीणी बरखास्त केली आहे. खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या प्रवेशाचा आणि कार्यकारिणी बरखास्तीचा कोणताही संबंध नाही.- दत्ता साळुंखे, जिल्हा प्रमुख, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)
