छत्रपती संभाजीनगर : रामदेवबाबासारखे पोटातील आतडे हलवून दाखवणारा, अतिवृष्टीमध्ये रात्री दीड – दोन वाजता छातीभर पाण्यात उतरुन मदत करणारा, सर्वसामांन्य माणसांसाठी चिखलात उतरणारा अशी समाजमाध्यमी ‘ लोकप्रिय’ प्रतिमा असणाऱ्या खासदार ओम राजेनिंबाळकरांना समाजमाध्यमांवर सध्या ‘गद्दार’ , ‘कलंक’ या शब्दात हिणवले जात आहे. दरम्यान ओम राजेनिंबाळकर यांच्या समाजमाध्यमाच्या अधिकृत स्थळांवर कमालीच्या तिखट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. आपण पुण्यात आहोत. शिंदेसेनेमध्ये जाण्याचा निर्णय वडील पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल लागल्यानंतर घेऊ’ असे त्यांनी ‘ लोकसत्ता ’ शी बोलताना सांगितले.

ओम राजेनिंबाळकर यांची प्रतिमा समाजमाध्यमांमध्ये लोकप्रिय या सदरात मोडणारी. इन्स्टाग्रामवर ५.७१ हजार, फेसबुकवर सहा लाख ०८ हजार, एक्सवर २९९००, युट्युबर एक लाख ३६ हजार ९९९ असे पाठीराखे असणारे ओम राजेनिंबाळकर यांचे राजकारण तसे सर्वसामांन्य मतदारांच्या मनावर गारुड घालणारे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गळ्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा रुमाल बांधून हलगी वाजवणारा एक मतदार व्यक्त होताना, आपण मतदान ओम राजेनिंबाळकर यांनाच करू, असे सांगित होता. मात्र, विरोधाचा सूर सत्तेच्या बाजूने झुकल्याचे दिसू लागताच समाजमाध्यमांवर ओम राजेनिंबाळकर यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे.

ओम राजेनिंबाळकर यांना शिवसेनेकडून ‘ व्हीप ’ बजावण्यात आला होता. मात्र, तो प्रत्यक्षात ओम राजेनिंबाळकर यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही, असा दावा केला जात आहे. मात्र, राजेनिंबाळकर गुरुवारी दुपारपर्यंत पुण्यातच होते. ‘दिवसभर मी पुण्यात आहे,’ असे ते म्हणाले. व्हीप बजावूनही बैठकीला न गेल्याने ओम राजेनिंबाळकर शिंदे सेनेमध्ये जाणार यावर एकप्रकारचे शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. ‘ पोपट मेला आहे , तो जाहीर करणे बाकी आहे ’, अशी प्रतिक्रिया त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून ऐकावयास मिळाली.

शिंदे सेनेऐवजी भाजपच्या पर्यायाचीही चाचपणी

धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे सेनेविषयी मतदारांमध्ये रोष आहे. तसाच राग राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काढला. तो एवढा होता की ओम राजेनिंबाळकर हे राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या मताच्या फरकाने विजयी झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ओम राजेनिंबाळकर यांना अर्चना पाटील यांच्या पेक्षा ३ लाख २९ हजार मते अधिक पडली. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेऐवजी भाजपचा पर्याय स्वीकारता येईल का, यावरही चर्चा झाली होती, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, भाजपाला सध्या मदत करण्यासाठी शिंदेसेनेमध्ये ओम राजेनिंबाळकर यांनी शिंदेसेनेमध्ये यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ठाकरे गटात फूट पडलीच आहे. त्याला २० तारखेनंतर मूर्त रुप येईल, असे सांगण्यात येत आहे.