छत्रपती संभाजीनगर : शेतकर्यांच्या उसाचे रास्त व किफायतशीर दर दिल्याचे साखर आयुक्तालयात नोंदवून, विक्रमी गाळपाची जाहिरात करताना ‘महाशक्ती’ पाठीशी असल्याचे सांगणार्या ‘ओंकार शुगर प्रा. लि.’ या बाबूराव बोत्रे पाटील यांच्या नेतृत्वातील कारखान्यांनी शेतकर्यांच्या खात्यावर रक्कम खरोखर टाकली का, याची आता चौकशी होणार आहे. साखर आयुक्त तानाजी कोलते यांनी या वृत्तास दुजोरा दिला. एका बाजूला ही प्रक्रिया सुरू असतानाच राज्यातील विविध भागातील शेतकर्यांचा रोष वाढला असून ‘बोत्रे पाटील’ यांच्या विरोधात ‘एफआरपी’साठी आंदोलने केली जात आहेत.
गाळप हंगाम संपल्यानंतर साखर आयुक्तालयामार्फत रास्त व किफायतशीर दर किती दिला व किती शिल्लक राहिला याचा एक अहवाल केला जातो. या अहवालानुसार ओंकार शुगरच्या राज्यातील १४ साखर कारखान्यांनी ५५ लाख ९४ हजार ४९२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. ओंकार शुगरकडून १३४३ कोटी ७८ लाख रुपयांचे रास्त व किफायतशीर देणी अपेक्षित होती. त्यापैकी १०७ कोटी १५ लाख ९६ लाख रुपयांची देणी बाकी असल्याचे अहवाल साखर आयुक्तालयात आहेत. मात्र यावर शेतकर्यांचे आक्षेप आहेत. कागदोपत्री पैसे दिले असे अहवाल तयार केले गेले. प्रत्यक्षात रक्कम अदाच केली गेली नाही असे आक्षेप शेतकरी प्रतिनिधींनी घेतला होता. या विरोधात मंत्रालयातही बैठक घेण्यात आल्यानंतर प्रत्येक कारखान्यातील सभासदापर्यंत पैसे मिळाले नाही, याची तपासणी केली जाणार आहे.
थकीत ऊस देयके बाकी असणार्या प्रत्येक कारखान्याने रक्कम जमा केली की नाही हे तपासण्याचे निर्देश प्रादेशिक साखर संचालकांना दिले आहेत. ओंकार शुगर समूहाकडून किती देयके बाकी आहेत, याची माहिती नुकतीच सुनावणी दरम्यान घेण्यात आली. त्यामुळे देयके अदा करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला असल्याचे दिसून येत आहे.
परळीच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर आंदोलन करणारे किसान सभेचे अजय बुरांडे म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यात कारखाना प्रशासनाने २९५० रुपये प्रति टन दराने शेतकर्यांना पैसे अदा केले. पण जानेवारीनंतर कोणालाही पैसे दिले नाहीत. त्यामुळे आंदोलनाला बसलो आहोत. आता फक्त १८०० रुपये प्रति टन दराने रक्कम खात्यावर टाकली जात आहे. हा शेतकर्यांवर अन्याय आहे. मशागतीसाठीही ऊस उत्पादकांकडे पैसे नाहीत. ही शेतकर्यांची साखर समूहाकडून झालेली फसवणूक आहे’ केवळ परळी नाही तर निलंगा तालुक्यातील अंबुलगा साखर कारखान्यावरील शेतकर्यांनी आमची रक्कम अदा करा असे म्हणत आंदोलन केले. सांगली साखर कारखान्यावर व्यवस्थापकांच्या अंगावर जाण्यापर्यंत आंदोलन झाले. सोलापूर जिल्ह्यात ‘ओंकार’ शुगरचे चार कारखाने आहेत. या जिल्ह्यातही आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे अनेक तक्रारी आल्यानंतर ओंकार शुगरच्या सहा कारखान्यातील ‘एफआरपी’ बाबत सुनावणी झाली आहे, तर उर्वरित कारखान्यांची सोमवारी सुनावणी होणार आहे. ‘एकूणात केलेले गाळप आणि अदा केलेली एफआरपी लक्षात घेता काही टक्केच रक्कम देणे शिल्लक होते. ती रक्कमही अदा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे म्हणणे ओंकार शुगरकडून साखर आयुक्तालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शेतकरी मात्र आता या साखर कारखाना प्रशासनावर विश्वास राहिला नाही, असे सांगत आहेत. ऊस खरेदी करण्यासाठी जाहीर केलेले दर देणे तर दूरच उलट उसाची किफायतशीर किंमतही कारखाना अदा करू शकत नसल्याचे चित्र राज्यभर दिसून येत आहे.
राज्यात सहकारी बँकाकडून कर्ज
शेतकर्याची रक्कम थकवली जात असेल तर ज्या बँकांकडून साखर कारखान्यांनी कर्ज घेतले आहे, त्या बँकांची स्थिती अधिक खालावलेली असू शकते, असा दावा केला जात आहे. या साखर समुहाचे काही कारखाने तेलंगणामध्ये ‘ट्रायडंट’ या नावाने सुरू आहेत. ओंकार शुगर या साखर समूहास राज्यात ‘सहकारी’ बँकेने अधिक सहकार्य केले आहे. कर्नाटक आणि तेलंगणातील कारखान्यास राष्ट्रीयीकृत बँकाने कर्ज दिले आहे. कोल्हापूरमधील कारखान्यासाठी वारणा शेतकरी बँकने कर्ज दिले आहे.
