छत्रपती संभाजीनगर : परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याबरोबर आता धाराशिवचे खासदार ओम राजे निंबाळकर हेही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याची तयारी करत असल्याच्या चर्चांने शुक्रवारी पुन्हा जोर धरला. मात्र, या चर्चा निरर्थक असल्याचा दावा त्यांनी समर्थकांनी केल्या आहेत. केवळ शिवसेनेतील नवे प्रवेशच नाही तर सेना मंत्र्यांच्या खात्यातही बदल करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या राजकीय हालचालींबाबत बोलताना ‘आगे आगे देखा होता है क्या ’ असे हिंदीमध्ये म्हणत ‘ ऑरेशन टायगर’ ची चर्चेस पुन्हा गती दिली. धाराशिव जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले , ‘शिवसेनेमध्ये येणाऱ्यांचे ‘इनकमिंग’ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सध्या कोणतीही निवडणूक नसली तरी, सामान्य कार्यकर्त्यांपासून ते आमदार, खासदार आणि माजी मंत्र्यांपर्यंत अनेकांचा ओढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाकडे आहे.”

​खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशाबाबत विचारले असता, आबिटकर यांनी थेट नाव घेणे टाळले. मुख्यमंत्री शिंदेंच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक सोबतीला येत आहेत आणि ही प्रक्रिया अशीच सुरू राहील, असे म्हणत त्यांनी ओम राजेनिंबाळकर यांच्या पक्ष बदला विषयी संशय वाढवला. या अनुषंगाने निंबाळकर यांच्या समर्थकांनी हे दावे खोडून काढले आहेत.

या अनुषंगाने ‘ लोकसत्ता’ शी बोलताना निंबाळकर यांनीही असा पक्ष बदल होणार नाही, असे सांगितले. मात्र, सत्तेच्या गटात ओम राजेनिंबाळकर यांनी यावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचा ठाकरे गट सोडून धनुष्यबाण हाती घ्यावे असे प्रस्ताव पूर्वीही आले होते. पण त्याकडे कधीच लक्ष दिले नाही, असे ओम राजेनिंबाळकर म्हणाले.

दरम्यान जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीनंतर पुढील काळात निधी कसा मिळेल अशी चिंता ठाकरे गटातील खासदार आणि आमदारांसमोर आहे. त्यामुळे विरोध करण्याऐवजी सत्तेत जाता येईल का, याची चाचपणी केली जात आहे, अशी चर्चा सुरू होती. काळाचे भान ठेवून निर्णय घ्यावे लागतील, असे परभणीचे जाधव एका मुस्लिम कार्यकर्त्यांशी संवाद करताना म्हणाल्याची ध्वनीफित अलिकडेच समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाली होती. यामुळे संजय जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू होती.

या चर्चे दरम्यान ओम राजेनिंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षातरांच्या चर्चा निरर्थक असल्याचे ते म्हणाले. या चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहेत. पण त्यात काही तथ्य नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. अशी चर्चा हा षडयंत्राचा भाग असल्याचे ओम राजेनिंबाळर यांच्यावतीने सांगण्यात येत आहे.