सोनपेठ तालुक्यातील दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पाहणी पथकाने हमरस्त्यावर पीक परिस्थितीची पाहणी करून आपला पाहणीचा फार्स पूर्ण केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान केंद्रीय पथकासमोरच वडगाव येथील एका शेतकऱ्याने गळ्यातील रुमालाने फास घेण्याचा प्रयत्न केला.
गेल्या तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून निसर्गाच्या दुष्टचक्राचा सामना करणाऱ्या सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक पाहणीसाठी शनिवार (दि. २१) रोजी दुपारी आलेल्या केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाने परळी गंगाखेड हमरस्त्यावर असलेल्या वडगाव येथील रोड लगतच्या शेतांची पाहणी करण्यासाठी हे पथक थांबले असता त्यांनी रोड लगतच्या शेतीची पाहणी केली. यावेळी वडगाव येथील शेतकरी हरिभाऊ जाधव यांना शेतीची परिस्थिती दाखवताना आपल्या भावना अनावर झाल्या व त्यांनी केंद्रीय पथकासमोर आपल्या गळ्यातील रुमालाने फास घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना तेथे उपस्थित लोकांनी थांबवले. यामुळे काही काळ परिस्थिती तणावाची बनली होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांनी पथकाला शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षांत काहीच उत्पन्न झाले नसून येणारे पूर्ण वर्ष भागवायचे त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आíथक मदत उपलब्ध करून देण्याची विनंती अन्यथा मोठय़ा प्रमाणात आत्महत्याचे सत्र सुरू होण्याची भीती व्यक्त केली. यावेळी केंद्रीय पथकासोबत जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डुंबरे, जिल्हा कृषी अधिकारी दिवेकर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार महादेव सुरवसे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. वडगाव येथील पाहणीनंतर हे पथक खराब रस्त्यामुळे सोनपेठ तालुक्याला डावलून परळी, शिरसाळा माग्रे पुन्हा सोनपेठ येथे आले व विटा येथे पाहणी करून पथक पाथरी तालुक्यात गेले. आपल्या पाहणी दौऱ्याचा फार्स पूर्ण केला. या धावत्या दौऱ्यामुळे सरकारकडून किमान सहानुभूतीची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.