हिंगोली, औरंगाबाद : छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडय़ात अनेक ठिकाणी सोमवारी सायंकाळी, मध्यरात्री व मंगळवारी विजांचा कडकडाट आणि वादळवाऱ्यासह पाऊस झाला. हिंगोलीत वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. औरंगाबाद, फुलंब्री व जालना तालुक्यांत प्रत्येकी एक गाय दगावली. अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेल्या गहू व हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातीत शिंदेवाडी पानकनेरगाव येथील विलास गव्हाणे (३५) यांचा वीज पडून मृत्यू झाला. औरंगाबाद तालुक्यातील आडगाव खुर्द येथे कृष्णा गाडेकर यांची, फुलंब्री तालुक्यातील पाल येथील कौतिक जाधव यांची शेतात बांधलेली गाय रात्री वीज पडून मृत्युमुखी पडली. तर जालना तालुक्यातील गवळी पोखरी येथेही एक गाय वीज पडून दगावली. औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे.
नगरच्या १३६ गावांना दणका
नगर जिल्ह्यात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यांसह झालेल्या, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे १३६ गावांतील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. सुदैवाने जिल्ह्यात कोठेही जीवितहानी झाली नाही. वादळी वाऱ्याने नगर शहराच्या अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. अकोले, संगमनेर व पारनेर तालुक्यांतील काही गावांना गारपिटीचा फटका बसला. काढणीला आलेल्या गावासह मका, टोमॅटो, द्राक्ष, टरबूज, कांदा, कोबी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारीही अनेक भागांत पावसाने हजेरी लावली.
कोकणच्या फळबागांचा ‘शिमगा’
कोकणात होळी उभी राहिल्यानंतर पावसाचा शिडकावा होतो, अशी परंपरा सांगितली जाते. त्यानुसार यंदाही शिमगोत्सवात पावसाळी वातावरण तयार झाले होते. मंगळवारी दिवसभर वारे सुटले होते. ढगाळ वातावरणही होते. पण पाऊस पडला नाही. गेले काही दिवस उन्हाचा कडाका वाढल्यामुळे झाडावरील फळ वेगाने तयार होत आहे. त्यातच सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे फवारणीचा खर्च वाढणार आहे. आणखी काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली असल्याने बागायतदारांनी धास्ती घेतली आहे. पाऊस पडला तर शेवटच्या टप्प्यातील आंब्याच्या मोहोराचे नुकसान होणार आहे.
नुकसानग्रस्त जिल्हे
सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाले असून, त्या खालोखाल खान्देशातील जळगाव, धुळे, नंदूरबारला अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. वाशिम, हिंगोली, बुलढाणा, सोलापूर, नगरसह मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांत काही ठिकाणी अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. नाशिकची प्रमुख पीके असलेल्या द्राक्ष आणि कांद्याचे नुकसान झाले आहे. काढणी सुरू असलेला कांदा भिजल्यामुळे कुजण्याची भीती आहे. शिवाय उन्हाळी कांद्याची काढणी एप्रिल महिन्यात सुरू होते. त्यालाही पावसाचा फटका बसणार आहे. नगर जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंबाचे नुकसान झाले आहे.