छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून तिघांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात सोमवारी रात्री १०.१५ च्या सुमारास एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर पैठणगेट परिसरात मंगळवारी दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. शंभरपेक्षा अधिक दुकानदारांनी दिवसभर दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केला. हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इम्रान अकबर कुरेशी (वय ३३) याच्यावर शिल्लेखाना परिसरातील स्मशानभूमीत कडेकोट बंदोबस्तात मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी गंभीर जखमी इब्राहिम नसीर कुरेशी याच्या फिर्यादीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख परवेज शेख महेमूद (३८, रा. जटवाडा), शेख सलीम शेख शरीफ (३८), शेख खय्यूम शेख शरीफ (४२) व शेख फैजल शेख नाजीम (२३, सर्व रा. खोकडपुरा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या चारही जणांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. एन. ठाकूर यांनी आरोपींना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, मृत इम्रान कुरेशीच्या अंत्यसंस्कारावेळी मोठी गर्दी झालेली होती. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. शीघ्र कृती दल पथकासह ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. वाळूजसह अन्य पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनाही पाचारण करण्यात आले होते.आरोपी सलीम शेखच्या दुकानाजवळील अंडा भुर्जीच्या गाड्याजवळ सोमवारी रात्री परवेजशी इम्रानचा वाद झाला. भुर्जीच्या गाड्यावर वारंवार का येतो, असा त्यांच्यात संवादही झाला. त्यातून शाब्दिक चकमक झाली व नंतर वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले.

यामध्ये इम्रानचा जागीच मृत्यू झाला. परवेजने इम्रानचा भावोजी हारून उस्मान कुरेशी (रा. मुंबई) व इब्राहिम नासीर कुरेशीवरही हल्ला केला. या दोघांवर सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री घटना घडल्यानंतर घाटीमध्ये मोठा जमाव एकत्र आला होता. मंगळवारी सकाळी इम्रानच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी कडेकोट बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. पैठण गेटवरील व्यावसायिकांनी घटनेच्या निषेधार्थ दिवसभर दुकाने बंद ठेवली होती. शिल्लेखाना ते पैठण परिसरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला होता.