कांद्याला किलोमागे नाममात्र दीड रुपये भाव मिळू लागल्याने उत्पादक शेतकऱ्यांना कांदा बाजारात घेऊन जाणेही तोटय़ात जाऊ लागले आहे. काही महिने बी, खत, पाणी घालून मेहनतीने पिकवलेल्या कांद्याने डोळ्यात पाणी आणले. कांद्याला भाव मिळावा, या साठी त्रस्त शेतकऱ्यांनी कडा येथे बुधवारी रस्त्यावर कांदा टाकून धरणे आंदोलन केले. पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला या वेळी कांद्याच्या माळा घालून निषेध करण्यात आला. जिल्ह्यातील कडा (तालुका आष्टी) येथे कांदा उत्पादकांनी हे आंदोलन केले. या परिसरात मोठय़ा प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. यंदा पावसाअभावी दुष्काळी स्थिती असताना शेतकऱ्यांनी काटकसर करीत कांदा पिकवला. मात्र, अचानक कांद्याचे भाव पडल्याने कांद्याचे करायचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. बाजारात कांद्याला कवडीमोल दीड रुपया भाव मिळत असून वाहतूक आणि आडतीचाच खर्च दोन रुपये होऊ लागला आहे. त्यामुळे एक क्विंटल कांदा विकून शेतकऱ्यालाच ४०० रुपये द्यावे लागत आहेत. या पाश्र्वभूमीवर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नगर-बीड रस्त्यावर कांदा टाकून आंदोलन केले. या वेळी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सुरेश धस यांनीही गळ्यात कांद्याची माळ घालून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमांना कांद्याच्या माळी घालून संताप व्यक्त करण्यात आला.