कांद्याचे दर घसरल्याने तो विक्रीसाठी बाजार समितीत विक्रीसाठी न्यायचा नाही, असे ठरविले जात असून शुक्रवारपासून (दि. ६) विक्रीबंद आंदोलन हाती घेणार असल्याचे धनंजय धोर्डे यांनी सांगितले. वैजापूर तालुक्यातील कांदाउत्पादक शेतकऱ्यांना संघटित करून हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. आंदोलनासाठी वैजापूरसह नाशिक जिल्हय़ातील बाजार समित्यांमध्येही जनजागृती केली जात असल्याचे धोर्डे यांनी सांगितले. कांदा उत्पादकांना योग्य भाव द्यावा, या मागणीचे निवेदन त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी दिले.
चांगल्या प्रतीचा कांदा ५०० ते ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केला जात आहे. निम्न प्रतीच्या कांद्यास १०० रुपये दर दिला जात आहे. त्यामुळे केलेला खर्चही निघत नाही. दुष्काळात रब्बीमध्ये कांदा पिकाला चांगला भाव येईल, या आशेवर अनेकांनी तो लावला होता.
मात्र, दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वैजापूर, गंगापूर, लासूर, फुलंब्री, कन्नडसह जालना जिल्हय़ातील अंबड, परतूर, भोकरदनमध्ये कांदालागवड मोठय़ा प्रमाणात होती. दर कोसळल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. किमान २ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळावा, अशी मागणी धोर्डे यांनी निवेदनाद्वारे केली.
योग्य ती कार्यवाही न झाल्यास शुक्रवारपासून कांदा विक्री बंद आंदोलन केले जाणार आहे.