खरिपाकडून दारुण निराशा आणि परतीच्या पावसानेही हात आखडला या पाश्र्वभूमीवर सध्या ग्रामीण भागात रब्बी हंगामही संकटात सापडला आहे. जिल्ह्य़ात ३ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित असताना ६ ऑक्टोबपर्यंत ९ पकी ७ तालुक्यात केवळ ४.८९ टक्केच पेरणी झाली. या वर्षी शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीवर भर दिला आहे. कृषी विभागाकडून लाभार्थी शेतकऱ्यांना अल्पदरात मिळणारा हरभऱ्याच्या बियाणांचा साठा तुटपुंजा असल्याने शेतकऱ्यांना बाजारातून महागडे बियाणे खरेदी करावे लागत आहे. कृषी विभागाच्या या बियाणांविषयीही जिल्हाभरात सर्वत्र तक्रारी येत आहेत.
रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी हस्त व चित्रा ही दोन नक्षत्रे महत्त्वाची असतात. विशेषत: शेतकरी हस्त नक्षत्रात पेरणी करण्यावर भर देतात. कोरडवाहू क्षेत्रावर हस्त नक्षत्रामध्ये पडणाऱ्या परतीच्या पावसाची ओल राहात असल्याने या दिवसातील पेरणी लाभधारक ठरते. विशेषत: परभणी जिल्हा ज्वारी पिकवणारा असल्याने या नक्षत्रातील पाऊस रब्बीसाठी नेहमीच लाभदायक ठरतो, पण २७ सप्टेंबरला सुरू झालेले हस्त नक्षत्र रविवारी (दि. ११) संपत असून सोमवारपासून चित्रा नक्षत्राला प्रारंभ होत आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटी परतीचा पाऊस पडतो. यंदा मात्र हा पाऊस झाला नसल्याने जमिनीत ओलावा शिल्लक राहिला नाही. वाढत्या उन्हामुळे जमिनी रखरखीत झाल्या आहेत. त्यामुळे पेरणी करावी की नाही या विवंचनेत शेतकरी आहेत.
जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र ३ लाख १८ हजार हेक्टर आहे. यंदा खरिपातील पिके निघाली नसल्याने या क्षेत्रात आणखी भर पडली आहे. आता एकूण ३ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. यामध्ये ज्वारीसाठी दोन लाख २ हजार हेक्टर, गहू ४३ हजार, हरभरा १ लाख २ हजार, करडई २७ हजार, सूर्यफूल २ हजार, मका ५०० तर इतर पिकांच्या पेरणीसाठी ३ हजार ५०० हेक्टर जमिनीवर पेरणी अपेक्षित आहे. मात्र, ६ ऑक्टोबपर्यंत केवळ ४.८९ टक्के पेरणी ७ तालुक्यात झाली आहे. सोनपेठ व जिंतूर तालुक्यांतील आकडेवारी उपलब्ध झाली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ज्वारीची ७.३ टक्के, तर हरभऱ्याची ४.७ टक्के पेरणी झाली आहे. येत्या १५ दिवसात उर्वरित पेरण्या उरकल्या जातील. अजूनही शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहात आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व राष्ट्रीय गळीत धान्य अभियानांतर्गत कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी माफक दरात लाभार्थी शेतकऱ्यांना हरभरा बियाणांची विक्री केली जाते. तलाठी कृषी सहायकांच्या मदतीने प्रत्येक गावातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ठरवून वेगवेगळ्या खासगी दुकानदारांमार्फत बियाणांची विक्री केली जाते. यंदा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ९ तालुक्यांसाठी दोन हजार क्विंटल हरभरा बियाणे उपलब्ध झाले आहे. यामध्ये परभणीसाठी ३२०, सेलूसाठी २४०, पाथरी २४०, जिंतूर ३२०, मानवत, पालम, पूर्णा, सोनपेठ प्रत्येकी १६०, गंगाखेड २४० या प्रमाणात बियाणे आली आहेत. राष्ट्रीय गळीत धान्य अभियानांतर्गत जिंतूर, गंगाखेड, पूर्णा, पालम, सोनपेठ या पाच तालुक्यांसाठी ७५० किलो करडई, तर ७१० क्विंटल हरभरा बियाणे उपलब्ध झाले आहे. हे बियाणे महाबिजच्या दरानुसार ५२ रुपये किलोप्रमाणे दिले जाते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ७० रुपये किलो दराने बियाणे उपलब्ध आहे. बाहेर मात्र याचे दर ८० ते ९० रुपये आहेत. ज्वारीपेक्षा हरभरा पिकातून अधिक उत्पादन मिळेल, या आशेने शेतकरी हरभऱ्याकडे वळले आहेत. परंतु बाजारात हरभरा बियाणे महाग आहे. कृषी विभागाने जास्तीत जास्त बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. परतीच्या पावसाने जणू आता माघार घेतल्याने रब्बी हंगामापुढेही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.