छत्रपती संभाजीनगर : ‘ ऑपरेशन टायगर ’ मध्ये मराठवाड्यातून संजय जाधव यांच्याबरोबर धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर हेही सहभागी होतील. पवन राजेनिंबाळकर यांच्या निकाल २० जून रोजी लागणार असून त्यानंतर ते शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी होतील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर नावाने ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न पुढील दोन किंवा तीन दिवसात पूर्णत्वास येईल. दरम्यान नांदेडहून एका विशेष विमानाने संजय जाधव आणि यवतमाळचे आमदार दिल्ली रवाना झाले आहेत.
गेल्या दीड वर्षापासून ठाकरे यांचा पक्ष पुन्हा एकदा फुटेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, नारीशक्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर केंद्रीय पातळीवरुन फोडाफोडीच्या राजकारणाला पुन्हा सुरुवात झाली होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर ठाकरे यांच्या सेनेतील एक गट पुन्हा फुटेल अशी चर्चा सुरू होती. यामध्ये संजय जाधव यांनी तर पूर्वीच जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्यासमवेत जाण्याचे जाहीर केले होते. मराठवाड्यातून ओम राजेनिंबाळकर यांच्या नावावर वारंवार प्रश्नचिन्ह लावले जात होते.
स्थानिक पातळीवर भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याशी असणाऱ्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ते ठाकरे यांच्याबरोबर राहतील असे सांगण्यात येत होते. शिवाय पहिल्या फुटीच्या वेळी ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी ‘ निष्ठावंत ’ अशी प्रतिमा कमावली होती. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये दणदणीत पराभव झाल्यानंतर ओम राजेनिंबाळकरांचा संभ्रम वाढला होता. याच काळात पवन राजेनिंबाळकर हत्येचा निकाल लागेल अशी शक्यता होती. मुंबई सत्र न्यायालयाने २० जून रोजी निकल वाचन केले जाईल असे सांगितले. या निकालानंतर ओम राजेनिंबाळकर शिंदेसेनेमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते.
शिवसेनेच्या ठाकरे गटातील सहा खासदारांची नावेही गट म्हणून पुढे येऊ लागली आहेत. यात मराठवाड्यातील तीन खासदार असतील असे सांगण्यात येत आहे. नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव चर्चेत आहे. संसेदेमध्ये तीन चतुर्थ्यांश मते भाजपच्या बाजूने असावीत म्हणून सुरू असणाऱ्या फोडाफोडीच्या खेळाला आता वेग आला आहे. विरोधात राहून मतदारांची कामे पूर्णत्वास येत नाहीत, त्यासाठी लागणारा निधी मिळाला तर अधिक सोयीने राजकारण करता येईल, असा युक्तीवाद केला जात आहे. मात्र, मराठवाड्यातील तीन खासदार शिवसेनेच्या शिंदे गटास हाती लागतील, असे चित्र आहे.
