छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र गृह विभाग ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ अंतर्गत नागरिकांचा पोलीस व्यवस्थेवर अभिप्राय घेत असून, सर्वेक्षण सुरू करा आणि तेही दोन दिवसांत पूर्ण करा. एक जबाबदार नागरिक म्हणून आपला अभिप्राय देणे हे कर्तव्य आहे, असा संदेश सध्या समाज माध्यमावरून फिरत असून, त्याविषयी समाजमाध्यम वापरकर्त्यांमध्ये काहीशी अनामिक भीती आणि संभ्रम निर्माण झालेला आहे. संदेश किती खरा, किती खोटा, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलीस विभागाकडूनही काळजीपूर्वक माहिती सादर करताना बँक खाते आदींच्या नोंदी देऊ नयेत, असेच सांगितले जात आहे.

‘होम डिपार्टमेंट गव्हर्नमेंट’ या नावाने थेट ‘व्हाॅट्सॲप’वर संदेश येत आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये संदेश असून, अभिप्राय नोंदवण्यासाठी मराठी, हिंदी व इंग्लिश भाषेची निवड करायची आहे. त्यामध्ये संंबंधित नागरिकाची वैयक्तिक माहितीही विचारण्यात येत आहे. त्यात बँकेचे खातेही विचारले जात आहे. सरकारच्या काही विभागांकडून नागरिकांचे अभिप्राय मागवण्यात येत आहेत. मात्र, गृह विभागाविषयीच्या या संदेशाबाबत पोलीस संकेतस्थळावर कुठलीही माहिती नसल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय ‘विकसित महाराष्ट्र – २०४७’ अंतर्गत पोलीस विभागाकडून देण्यात येत असलेला क्रमांक ९९ पासून सुरू होणारा आहे, तर नागरिकांना आलेल्या संदेशावरील क्रमांक हा ९८ पासून सुरू होणारा असून, त्यावरील निळ्या रंगातील पट्ट्यात पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे वरील बाजूला व खालील भागात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची छायाचित्रे दर्शवण्यात आलेली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांनी अभिप्रायासाठी येणाऱ्या संदेशावर सर्वात वरती उजव्या बाजूला निळ्या (आकाशी) रंगाची एक खूण असल्याची खात्री करून घ्यावी. त्याचा अर्थ आलेला संदेश अधिकृत आहे. माहिती सादर करताना अधिक खोलात किंवा तपशीलात जाऊ नये. म्हणजे बँक खाते आदी न देता अभिप्राय द्यायला हरकत नाही. – शिवशंकर पांढरे, पोलीस निरीक्षक, सायबर ठाणे.