धाराशिव: प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मतदारसंघनिहाय सहा स्वतंत्र मतमोजणीचे हॉल असणार आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी १४ टेबल आणि प्रत्येक टेबलवर दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. इटीपीबीएस मतमोजणीसाठी सहा तर टपाली मतमोजणीसाठी १६ टेबलचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक फेरीला ८४ मतदान यंत्रावरील मतांची मोजणी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून सर्व विधानसभा मतदारसंघात एकूण १५५ मतमोजणीच्या फेर्‍या होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आवश्यक असलेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवार, ४ जून रोजी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ होईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासह नियुक्त करण्यात आलेले अधिकारी आणि कर्मचारी पहाटे ५.३० वाजता शासकीय तंत्रनिकेतन येथे हजर राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. प्रारंभी मतदान यंत्र कसे हाताळावयाचे, याबाबत पुन्हा एकदा कर्मचार्‍यांना तपशीलवार माहिती दिली जाणार आहे आणि त्यानंतर ८ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ होणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा : तुळजाभवानीच्या पुरातन दागिन्यांची ‘इनकॅमेरा’ तपासणी; पुरातत्व विभागाचे पथक तुळजापुरात दाखल

सोमवारी मतमोजणीच्या एक दिवस अगोदर कर्मचार्‍यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ऐनवेळी कोणतीही गडबड होवू नये यासाठी ३ जून रोजी मतमोजणीची रंगीत तालीम घेतली जाणार आहे. त्यासाठीही कर्मचार्‍यांना बोलावण्यात आले असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातून अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणीसाठी निवडण्यात आले आहेत. निवडण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांची कार्यशाळा घेवून त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. एकूण दीड हजाराहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेत सहभागी असणार आहेत.

हेही वाचा : “पंतप्रधान मोदींनी आता कायम ध्यानधारणाच करावी”, नाना पटोले यांची खोचक टीका; म्हणाले, “प्रचार संपल्यानंतर…”

बेंबळी रस्त्यावर वाहन पार्किंगची व्यवस्था

मतमोजणीच्या दिवशी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग आणि पर्यायी रस्त्यावर गर्दी होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघातून लोकप्रतिनिधींचे सदस्य, कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने मतमोजणी केंद्रावरती दाखल होतात. या सर्वांसाठी पार्किंगची व्यवस्था बेंबळी रस्त्यावर करण्यात आली आहे. कर्मचारी आणि अधिकार्‍यांसाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या बाजूला वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर: स्ट्राँग रुम आवारात वाहन धडकवणारा महावितरणाचा अभियंता निलंबित

मतमोजणीसाठी पाचशे पोलीस तैनात

मतमोजणीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन दक्ष झाले आहे. पोलीस प्रशासनाने त्यासाठी पूर्वतयारी केली आहे. ४५० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. तर ५० पेक्षा अधिक पोलीस अधिकार्‍यांचीही फौज मतमोजणी केंद्रावर तैनात असणार आहे. मतमोजणी केंद्रापासून शंभर मीटर परिसरात ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.