औरंगाबाद : देशाची सर्वांगीण क्षमता ही आध्यात्मिक शक्तीवर अवलंबून असते, भारताच्या आध्यात्मिक शक्तीत साधुसंतांनी दिलेले योगदान फार मोठे आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे बुधवारी सांगितले.

भागवत यांनी तेराव्या शतकातील वारकरी संत व कवी नामदेव यांच्या नरसी या हिंगोली जिल्ह्यातील जन्मगावी भेट दिली. त्यांनी नरसी खेडे तसेच आजूबाजूच्या गावातून आलेल्या स्थानिक लोकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, संत नामदेव यांनी धार्मिक जीवन कसे जगावे हे साध्या भाषेत सांगितले. वारकरी संप्रदायाचा संदेश त्यांनी पंजाबपर्यंत नेऊन पोहोचवला. यातून हिंदू समाजातील सलोखा व सुसंवाद प्रत्ययास येतो. पंजाबमधील लोकांनी संत नामदेवांना सहजतेने स्वीकारले. संत नामदेवांच्या ६१ ओव्या गुरू ग्रंथसाहिबमध्ये समाविष्ट आहेत. देशाची एकूण क्षमता ही त्या देशाच्या आध्यात्मिक शक्तीवर अवलंबून असते.