छत्रपती संभाजीनगर : ‘एमआयएम’ या पक्षाचे आता तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात अधिक नगरसेवक आहेत. तेलंगणामध्ये केवळ ६७ नगरसेवक आहेत तर राज्यात हा आकडा आता शंभरी पार गेला आहे. काही हिंदू नगरसेवकही ‘एमआयएम’ च्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यामुळे आमचा चेहराही धर्मनिरक्षेप असल्याचा दावा करत राज्यातील ग्रामीण मतदारसंघातही नशीब आजमावून बघण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले.

तेलंगणातील ‘एमआयएम’ पक्षाचा संबंध थेट हैदराबाद मुक्तिसंग्रामाशी जोडलेला असल्याने ‘एमआयएम’ हा मुस्लिमांचा पक्ष अशी पक्षाची प्रतिमा आहे. मात्र, आमचा ‘माेगल’, ‘निजाम’ आणि अगदी आक्रमक असणाऱ्या मोहम्मद गझनीशी संबंध नाही. तो इतिहास होता. आताच्या मुस्लिमांचा त्यांच्याशी काही संबंध नाही, अशी भूमिका एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि ॲड. असदोद्दीन ओवैसी यांनी जाहीरपणे मांडली.

भारतावर आक्रमण करणारे फक्त मोगल नव्हते. तर कुशान आणि होनही होते. मग त्यांच्यावर हल्ला करण्याची भूमिका घेतली तर मध्य आशियातील अनेक देशांवर हल्ला करावा लागेल, असे वक्तव्यही प्रचारसभांमध्ये ओवैसी यांनी केले होते. मुस्लिमांना राजकीय पटावर न्याय मिळविणे हीच आमची विचारधारा असे सांगत एमआयएमने महापालिकांमध्ये यश मिळवले.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सर्वाधिक ३३ जागांवर ‘मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन’ या पक्षाचे नगरसेवक निवडून आले. आत्मविश्वास वाढल्याने आतापर्यंत केवळ शहरी भागात असणाऱ्या या पक्षाने ग्रामीण भागातही लक्ष घालणार असल्याचे आवर्जून सांगितले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आम्ही पाच जणांची समिती नियुक्ती केली असून अनेक हिंदू उमेदवार ‘एमआयएम’ कडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे ते म्हणाले. निवडून आलेल्या १२५ नगरसेवकांमध्ये हिंदू नगरसेवकही विजयी झाले आहेत. आम्हाला जातीयवादी म्हणणाऱ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी असेही जलील म्हणाले.

एमआयएम या पक्षाचे नेतृत्व ॲड. असदोद्दीन आणि अकबरोद्दीन ओवैसी यांचे. तेलंगणानंतर बिहारच्या सीमांचल भागातही या पक्षास यश मिळाले होते. मात्र, राज्यातील महापालिकांमध्ये महाराष्ट्रात सातत्याने यश मिळत आहे. नांदेडमधून सुरू झालेला एमआयएमचा विस्तार वाढत असून ते आता ग्रामीण मतदारसंघात जिल्हा परिषद गट आणि गणात उमेदवार उभे करणार आहेत. शहरी भागात मुस्लिम, दलित मतांची बेगमी करत यश मिळविल्यानंतर ग्रामीण भागातही नशीब आजमावून बघणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एमआयएम उतरणार आहे. उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पाच जणांची समिती नियुक्त केली आहे. अनेक हिंदू लोकही आमच्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. आम्हाला जातीय आणि धार्मिक कट्टर ठरविणाऱ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी.’