औरंगाबाद : उत्तर सायबेरिया, अलास्कासारख्या देशात प्रामुख्याने आढळणारा पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर (सोन चिथल्या) या पक्ष्याचे जायकवाडीच्या परिसरात प्रथमच दर्शन झाले. निरीक्षणासाठी वनविभागाचे काही अधिकारी, पक्षी अभ्यासक रविवारी जायकवाडीत दाखल झाले होते. या वेळी परिसरात लहान वनस्पतींच्या अंतर्गत भागातील पाणथळीच्या मोकळय़ा जागी दहा ते बाराच्या संख्येने सोन चिथल्या पक्षी आढळून आले. जायकवाडीत ते प्रथमच आल्याची नोंद झाली आहे, असा दावा पक्षी अभ्यासकांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोन चिथल्या हा पक्षी साधारणपणे महाराष्ट्रातील समुद्री किनारा भाग, पुणे परिसरात दरवर्षी उत्तर सायबेरिया, अलास्कामधून नोव्हेंबर, डिसेंबरच्या दरम्यान स्थलांतरित म्हणून  दाखल होतो. एप्रिलपर्यंत मुक्काम करून प्रजननासाठी सायबेरियात परतात. त्यानंतर ते ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पुन्हा स्थलांतर करतात. आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक बेटांवर दक्षिणेकडे येतात. पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर उत्तरेकडे स्थलांतरित होण्याच्या काही दिवस आधी एकत्र येतात आणि तीन हजार फूट (सुमारे १ किमी) ते १६ हजार फूट (४.८८ किमी) उंचीवर उडतात. या पक्ष्यांनी ३-४ दिवसात तीन हजार मैल (४,८०० किमी) न थांबता उड्डाण केल्याची नोंद आहे.

जायकवाडीत रविवारी पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर हा प्रजनन काळातील रंग बदललेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच शिकारी पक्षी, प्राण्यांपासून वाचण्यासाठीही त्याचे रंग बदलण्यासारखी नैसर्गिक देण कामी येते.

जायकवाडीत दहा ते बाराच्या संख्येने नर आणि मादीच्या स्वरूपात आढळून आले. सोन चिथल्या हा पूर्ण वाढ झालेला पक्षी सुमारे २५ सें.मी. लांब असतो आणि त्याच्या पंखांची लांबी सरासरी ६१ सें.मी. असते. त्याचे सर्वात हलक्या, चरबीशिवाय वजन सुमारे १३५ ग्रॅम असते. मार्चमध्ये पक्ष्यांचे वजन वाढू लागते. सोन चिथल्याच्या पिलांना डोक्यावर आणि पाठीवर पांढरे-पिवळे अंडरपार्ट्स असलेले सोनेरी आणि काळे ठिपके असतात, अशी माहिती पक्षी अभ्यासक कुणाल विभांडिक यांनी सांगितली.

जायकवाडीत रविवारी पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर हा पक्षी आढळून आला. सध्या त्याचा प्रजनन काळ सुरू असून यादरम्यान रंग बदललेली त्याची अवस्था असते. बऱ्याचवेळा शिकारी पक्षी, प्राण्यांपासून वाचण्यासाठीही त्याचे रंग बदलण्यासारखी नैसर्गिक देण कामी येते. जायकवाडीत दहा ते बाराच्या संख्येने नर आणि मादीच्या स्वरूपात ते आढळून आले. सोन चिथल्याचे जायकवाडीत प्रथमच दर्शन घडले. 

– कुणाल विभांडिक, पक्षी अभ्यासक.

जायकवाडीत रविवारी पक्षी निरीक्षण करण्यात आले. अनेक पक्षी अभ्यासक होते. निरीक्षण करताना पॅसिफिक गोल्डन प्लोव्हर (सोन चिथल्या) हा पक्षी आढळून आला. सोन चिथल्या हा यापूर्वी कधी जायकवाडीत स्थलांतरित म्हणून आल्याची नोंद आहे का, याची माहिती घेतो आहोत.

– डॉ. राजेंद्र नाळे, प्रभारी विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) औरंगाबाद</strong>

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pacific golden plover bird first time spotted at jayakwadi zws
First published on: 16-05-2022 at 00:02 IST