छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील खुल्या कारागृहाच्या आवारातील एका चिंचेच्या झाडाला एक कैदी गळफास घेतलेल्या अवस्थेत शुक्रवारी सकाळी आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार मृत कैदी हा जन्मठेपेची शिक्षा भोगणारा असून, त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. शांतीलाल तान्ह्या ओझरे (वय ४४, रा. पालघर) असे त्याचे नाव असल्याची माहिती आहे.

पैठण येथे नाशिक कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी २०२३ मध्ये बंदीवान (क्रमांक सी. ५५१३) शांतीलाल ओझरे हा शिक्षा भोगण्यासाठी चांगल्या वर्तणुकीवर पैठण येथील खुले कारागृहात येथे वर्ग झालेला होता.

नित्यनेमाने कारागृहाच्या शेतीत काम करून आपली सजा शांतीलाल भोगत होता, या बंदिवानाने शुक्रवारी रोजी सकाळी कारागृहाच्या भिंतीच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याचा प्रकार कारागृहातील वास्तव्यास असलेल्या इतर बंदीवानांच्या निदर्शनास आला. त्यांनी ही घटना खुले कारागृह अधीक्षक राजेंद्र निमगडे यांना दिली.

तातडीने कारागृह प्रशासनाने या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांना दिली. पोलीस पथकासह खुले कारागृहात दाखल झाले. त्यासोबतच नायब तहसीलदार राहुल बनसोडे, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, उपनिरीक्षक संभाजी खाडे, उपनिरीक्षक अजीज शेख यांनी जाऊन पाहणी पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला.

या मृत बंदीवानाच्या परिवारातील सदस्य व न्यायालयाचे न्यायाधीश, महसूल अधिकारी, शासकीय पंच, खुले कारागृहातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात येणार असून मृत शांतीलाल ओझरे यांनी आत्महत्या का केली ? यासंदर्भात पैठण पोलीस पुढील तपास करीत आहे.
महाराष्ट्रात अगदीच मोजके खुले कारागृह असून, सुधारण्याच्या स्थितीत असलेल्या बंदिवानांना मोकळेपणाने ठेवले जाते. पैठणमधील शेवगाव मार्गावर असलेल्या या खुल्या कारागृहात बंदिवान शेती करतात. खुले पणाने शेती केली जाते.