छत्रपती संभाजीनगर – राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचे मंगळवारी येथे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचे पुढील दौऱ्यासाठी होणारे उड्डाण काही काळ येथे रखडले.

राज्याच्या पर्यावरणमंत्री तथा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ येथे आलेल्या होत्या. सोमवारी त्यांच्या पिशोर, घाटनांद्रा, चौका, आडगाव, बजाजनगर आदी ठिकाणी सभा पार पडल्या. सोमवारी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी होत्या. मंगळवारी सकाळी पंकजा मुंडे या लातूर, धाराशिव व सोलापूर या तीन जिल्ह्यातील त्यांच्या नियोजित सभांसाठी हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा विमानतळावरून निघण्याच्या तयारीत होत्या.

सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचा पुढील नियोजित दौरा निश्चित होता. या दौऱ्यासाठी निघण्याची तयारी सुरू असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांचे उड्डाण काही काळ रखडले. बिघाडाच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास होऊ शकत नाही, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर मुंबई येथून दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आल्याची माहिती पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय तथा भाजपचे कार्यकर्ते प्रवीण घुगे यांनी दिली.

पंकजा मुंडे यांच्या लातूर जिल्ह्यात तसेच धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भाने जाहीर सभा असून सायंकाळी त्या सोलापूरमध्ये मुक्कामी पोहोचणार होत्या. आता त्यांचा दौरा काहीसा उशिराने सुरू होईल. मात्र त्या सोलापूरमध्ये मुक्कामी पोचतील, असे त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.