छत्रपती संभाजीनगर : ज्या तीन शब्दामुळे पंकजा मुंडे यांना राजकीय पुनर्वसनासाठी झगडावे लागले होते ते ‘ जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ हे शब्द पुन्हा एकदा परळी व बीड शहराती फलकावर लावण्यात आले आहेत. या बॅनरमुळे परळी आणि बीडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्रात २०१४ ला युती सरकार स्थापन झाले. या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांच्यावर ग्रामविकास विभागाचे धुरा सोपवण्यात आली. मात्र, तेव्हापासूनच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे शब्द बीड आणि परळीच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे दिसून आले आहे. पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचा वाढदिवस जिल्ह्यात नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला आणि जागोजागी कार्यकर्त्यांनी अभिनंदनाचे फलक लावले.
यात पुन्हा चर्चा झाली जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री या फलकाची. वास्तविक पाहता कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात लावलेल्या अशा फलकाचा त्रास अनेकदा मंत्री पंकजा मुंडे यांना सहन करावा लागला असे कार्यकर्तेच खासगीत सांगतात. तरीही बीड शहर आणि जिल्ह्यात काही ठिकाणी मनातल्या मुख्यमंत्री पंकजाताई असे फलक पाहावयास मिळाले. पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना असे फलक लावू नका आणि घोषणाही देऊ नका असे सांगितले आहे. मात्र, बीड शहरतील विश्राम गृह आणि नगर नाका परिसरात असे फलक दिसून आले.
विधान परिषदेमध्ये स्थान मिळाल्यानंतर पुन्हा एकदा मंत्री झालेल्या पंकजा मुंडे यांनी नुकतेच ‘ मीच बीडची पालक आहे’, असे विधान अलिकडेच केले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असताना पालकत्वाचे जाहीर विधान चर्चेत असताना पुन्हा ते शब्द अवतरले आहेत.
