जालना : जिल्हा नियोजन समितीच्या ज्ञानिवारी झालेल्या बैठकीत मंजूर झालेल्या विषयांची अंमलबजावणी संबंधित प्रशासकीय यंत्रणांच्या आध्यमातून होत नसल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी केली. बदनापूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय झाला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार आमदार नारायण कुचे यांनी केली. त्यानंतर झालेल्या चर्चेचे पर्यवसान पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी तडकाफडकी बैठकीतून निघून जाण्यात झाले.
कुचे यांच्या अगोदर आमदार अर्जुन खोतकर यांनी जिल्हा नियोजन समितीने जालना शहरातील विकास कामांसाठी मंजूर केलेली कामे महानगरपालिका पातळीवर प्रशासकीय काळात आणि त्यानंतरही कशी होऊ शकली नाहीत, याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. आमदार बबनराव लोणीकर यांनीही प्रशासकीय पातळीवर काही कार्यालयांतील गैरप्रकाराच्या अनुषंगाने आरोप केले होते. विकास विषयक कामे आणि निर्णयांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर आमदार कुचे यांनी बदनापूर मधील रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केली. जिल्हा नियोजन समितीच्या निर्णयांची अंमलबजावणी जर प्रशासकीय पातळीवर होत नसेल तर अशा निर्णयांना अर्थ काय , अशी भावना आमदारांकडून व्यक्त झाल्या. आमदार कुचे यांनी यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर बैठकीतील वातावरण तापले आणि पालकमंत्री सभा बैठकीतून निघून गेल्या.
या अनुषंगाने आमदार बबनराव लोणीकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यशैलीवर जिल्ह्यातील आमदारांचा रोष होता. पण सर्वांचे मत ऐकून घेतले गेले. तीन तास बैठक चालली. शेवटी प्रत्येक बैठकीला एक मर्यादा असते. त्यामुळे त्या निघून गेल्या असे म्हणता येणार नाही. पण बैठकीमध्ये अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.’ जालन्यामध्ये अशिमा मित्तल सध्या जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत. आमदार नारायण कुचे यांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
