परभणी : कार आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन दुचाकीवरील बहिण- भाऊ जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी(दि. ७) दुपारच्या सुमारास तालुक्यातील झरी परिसरात घडली.

शितल महादेव व्यवहारे(वय २३) आणि राम महादेव व्यवहारे (वय २१) दोघे रा. वटकळी ता. सेनगाव जि. हिंगोली असे अपघातात ठार झालेल्या बगिणभावाची नांवे आहेत. शितल परभणी शहरात एका महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत होती. सोमवारी सकाळी तिचा भाऊ राम हा तिला गावाकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून परभणीत आला.

मंगळवारी सकाळी दुचाकी क्रमांक एमएच ३८ टी २२३१ ने गावाकडे जात असताना जिंतूर रस्त्यावरील झरी परिसरात परभणीच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने (क्रमांक एचआर २६ डीएफ ७८९०) जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी दूर जाऊन रस्त्याच्या कडेला पडली. या अपघातात दुचाकीवरील शितल आणि तिचा भाऊ राम व्यवहारे दोघेही घटनास्थळीच मृत्युमुखी पडले.

दरम्यान, अपघातानंतर स्विफ्ट डिझायर कारचालक वाहनास पसार झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी जखमी बहिण-भावांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांच्या पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत अडके आदींसह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.