परभणी :  भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी स्वीकृत सदस्याच्या निवडीला विरोध दर्शवत गटनेते बदलाची मागणी केली होती. पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या विरोधात नगरसेवकांनी असा पवित्रा घेतल्यानंतर आता भरोसे यांनी पक्षशिस्तीचे कारण दाखवत नगरसेवक व पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांविरुद्ध थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे लेखी तक्रार केली आहे. या सर्व संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी भरोसे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षातील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून आता पक्ष नेतृत्व यासंदर्भात काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

मागील काही दिवसात पक्षाच्या विविध महत्वपूर्ण बैठका, पत्रकार परिषद व प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये पक्षाचे बहुतांश नगरसेवक सातत्याने अनुपस्थित राहत असून या सदस्यांसह काही पदाधिकारी हे पक्षशिस्त धोक्यात आणत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना पाठविलेल्या एका लेखी पत्रात केला आहे. संबंधितांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करुन या सर्वांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

जिल्हाध्यक्ष भरोसे यांनी  प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांना पाठविलेल्या पत्रात भाजपच्या स्थापना दिनाच्या दिवशी नऊ नगरसेवक गैरहजर होते असे नमूद केले आहे. विधानसभा बैठक, अर्थसंकल्पीय पत्रकार बैठक, जिल्हास्तरीय बैठक, प्रशिक्षण कार्यशाळा, जिल्हा कार्यशाळा अशा पक्षाच्या उपक्रमांना हे नगरसेवक अनुपस्थित राहिले. डॉ. केदार खटींग, रितेश झांबड, मीना सुरेश वरपुडकर, गिरीजा शंकर आजेगांवकर, गणेश नंदकुमार टाक, विश्‍वजित बुधवंत हे नगरसेवक सातत्याने गैरहजर राहत असून त्यांच्या वारंवार गैरहजेरीमुळे पक्षाच्या कार्यात अडथळा निर्माण होत आहे. त्यांच्या अशा वर्तणुकीने पक्षाची संघटनात्मक शिस्त ढासळत आहे, असे भरोसे यांनी या पत्रात म्हटले आहे.

भाजपाच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर हे पक्षाच्या शिस्तीला बाधा आणणार्‍या व पक्ष विरोधी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे निदर्शनास येत आहे, असा आरोपही भरोसे यांनी केला आहे. पक्ष संघटनेच्या एकाही अधिकृत बैठकीस ते उपस्थित राहिले नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकारच्या वर्तनामुळे पालिका सदस्यांसह वाकोडकर यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करीत निलंबित करावे, अशी मागणी भरोसे यांनी केली आहे.

दरम्यान भाजपच्या नवनिर्वाचित महापालिका सदस्यात एकवाक्यता न झाल्याने व गटबाजी उफाळून आल्याने महानगरपालिकेंतर्गत स्थायी समितीच्या तीन सदस्यांसह एका स्विकृत सदस्याच्या निवडी संदर्भातील प्रक्रियाही पूर्णतः रखडली आहे. स्थायी समितीचे सदस्य व स्विकृत सदस्याच्या निवडीचा विषय भाजपच्या प्रदेशाध्यक्षांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.

महानगरपालिकेच्या पहिल्याच विशेष सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्याच्या निवड प्रक्रियेवर शिक्कामोर्तब होईल, असे अपेक्षित होते. परंतु, या विशेष सभेतील स्विकृत सदस्याची निवड प्रक्रिया तांत्रिक बाबीचे कारण समोर करीत पुढे ढकलण्यात आली. ही  प्रक्रिया भाजप पक्षांतर्गत हेवेदाव्यांमुळे रखडली ही बाब यानिमित्ताने समोर आली आहे.

स्विकृत सदस्य पदाकरीता भाजपाच्या गटनेत्या तिरुमला खिल्लारे यांनी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नावाच्या शिफारशीचे पत्र महापौर सय्यद इकबाल यांना सादर करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय जनता पक्षाच्या १२ पैकी ११ सदस्यांनी त्या नावास विरोध करीत आक्षेप नोंदवला. तसेच स्थायी समितीच्या तीन सदस्यांच्याही नावाची शिफारसच केली नाही. भाजप अंतर्गत या हेवेदाव्यांमुळे व गटबाजीमुळेच या संबंधीची निवड प्रक्रिया पूर्णतः ठप्प झाली हे या निमित्ताने स्पष्ट झाले. एकूणच परभणी महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक व महानगर जिल्हाध्यक्ष यांच्यातच मोठा बेबनाव निर्माण झाला आहे.