परभणी: गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेले काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद आता भरणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे आता जिल्हाध्यक्षांच्या निवडीबाबत काही नवे निर्देश घालून देण्यात आले आहेत. संबंधित व्यक्ती काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असावी तसेच त्या व्यक्तीने पक्षांतर केलेले असू नये यासारख्या निकषांचा यात समावेश आहे. माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्याकडे दीर्घकाळ काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद होते तथापि वरपूडकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने हे पद रिक्त आहे.
काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यात संघटन अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पक्ष विचारधारेची एकनिष्ठ आणि मागील अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षांतर्गत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेसच्या जिल्हास्तरीय समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवडण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे केंद्रीय निरीक्षक अजमतुल्लाह हुसेनी यांनी येथे आयोजित पत्रकार बैठकीत शनिवारी(दि. ४) दिली. येत्या २१ एप्रिलपर्यंत काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची नावे अंतिम केली जाणार असल्याचेही केंद्रीय निरिक्षक हुसेनी यांनी सांगितले.
याप्रसंगी जितेंद्र देहाडे, दादासाहेब मुंढे, काँग्रेस शहराध्यक्ष नदीम इनामदार, अनूसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, सुहास पंडित, नगरसेवक भगवान वाघमारे, गुलमीर खान, सुनील देशमुख आदींची उपस्थिती होती.
काँग्रेस पक्षाची उभारणी लोकशाही आणि संविधान तत्वावर झाली आहे. त्यामुळे संविधानिक पद्धतीनेच पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्षांची निवड व्हावी, यासाठी पक्षाचे खासदार राहुल गांधी आग्रही आहेत. यापूर्वी परंपरागत निवड पद्धतीने जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात येत होती. मात्र आता याबाबतीत पक्षाने बदल केला असून जिल्हाध्यक्ष म्हणून निवडीसाठी संबंधित कार्यकर्ता हा कमीत कमी तीन वर्षापासून काँग्रेस समितीचे कार्य करीत असावा, तसेच मागील काही वर्षात त्याने पक्षांतर केलेले असू नये, अशा महत्वपूर्ण अटी ठेवण्यात आले आहेत. असे यावेळी निरीक्षक हुसेनी यांनी सांगितले.
पक्ष निरीक्षक स्तरावर जिल्हाध्यक्ष निवडीसाठी पक्षाचे विविध विभागविभाग, सेलप्रमुख, सामाजिक संस्था, संघटना, पत्रकार यासोबतच महिला, मागासवर्गीय अशा विविध घटकांशी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेतून पुढे आलेली जिल्हाध्यक्षपदाची नांवे पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात येणार आहेत. त्यानुसार वरिष्ठ स्तरावरून येत्या २१ एप्रिलपर्यंत जिल्हाध्यक्ष निवड होण्याची शक्यता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
