गावठी पिस्टल, मॅक्झिन आणि तीन जिवंत काडतुसासह स्कॉर्पिओ वाहनधारकास परभणीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि. ५)रात्री १० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. या घटनेत पोलिसांनी १० लाख ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहर व ग्रामीण परिसरात गुन्ह्यांचा माग काढत असताना परभणी शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात एक स्कॉर्पिओधारक पिस्टल घेऊन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस हवालदार नेताजी गीत्ते, पोलीस उपनिरीक्षक गणेश सवंडकर, परिहार, पोलीस उपनिरीक्षक चट्टे, सहायक पोलीस उपनिरीक्षक भुजबळ, केंद्रे यांच्यासह पोलीस पथकाने तात्काळ माहिती मिळालेल्या घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शहरातील शासकीय विश्रामगृह परिसरात स्कार्पिओ वाहनधारक नागेश्वर उर्फ नागोराव गंगाधर हरबळे (रा. धामणगाव ता. वसमत जि. हिंगोली) यास स्कार्पिओ गाडीची झडती घ्यायची आहे असे सांगून तपासणी सुरू केली असता गाडीच्या पुढच्या डिक्कीमध्ये एक लोखंडी गावठी पिस्टल, लोखंडी मॅक्सिन व तीन जिवंत काढतुस मिळून आले. याबाबत आरोपीस विचारले असता त्याने हे पिस्टल रवी भवर (रा. वणी जि. नाशिक) यांनी दिल्याचे सांगितले.
या कारवाईत ३० हजार रुपयांचे पिस्टल, १ हजार ५०० रुपयांचे तीन जिवंत काढतुस आणि स्कॉर्पिओ क्रमांक एमएच ३८ एके ०५३३ असा एकूण १० लाख ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेची पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सवंडकर, पोलीस अंमलदार सुग्रीव केंद्रे यांच्यासह पोलीस पथकाने केली.या प्रकरणी पोलीस हवालदार नेताजी गीत्ते यांच्या फिर्यादीवरून नागेश्वर उर्फ नागोराव गंगाधर हरबळे व रवी भवर याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम कायद्यान्वये नवा मोंढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
