परभणी: घरात वारंवार शिवीगाळ करत असल्याने घरमालकांनी ३१ वर्षीय भाडेकरू तरुणाचा भोसकून खून केल्याची घटना येथील गंगाखेड रस्त्यावरील फरीद कॉलनी परिसरात सोमवारी (दि.२) उघडकीस आली. याप्रकरणी चौघा आरोपींविरुद्ध कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शमा खान हबीब खान रा. बागवान गल्ली गंगाखेड रस्ता परभणी यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली. शमा खान हबीब खान यांचे कुटुंब परभणीतील गंगाखेड रस्त्यावरील बागवान गल्ली येथे भाड्याने राहते. सोमवारी शमा खान यांचा मुलगा इरफान रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कामावरून परत आला असता घरातील कुलर लावण्यावरून वडील आणि इरफान यात वाद झाला. यावेळी इरफान वडीलास जोरजोराने शिवीगाळ करू लागला. हे ऐकून घरमालक शेख लतीफ शेख यासीन, शेख एजाज शेख लतीफ, शेख साबेर शेख लतीफ आणि शेख बब्बू शेख लतीफ असे चौघेजण भाडेकरू असलेल्या इरफानच्या खोलीत आले.
तू नेहमीच जोरजोरातच शिवीगाळ करतो. आमच्या घरात आई – बहिणी आहेत, असे म्हणून थापड- बुक्क्यांनी मारहाण करू लागले. त्यावर इरफान मी माझ्या वडिलांना शिव्या देत आहे तुम्हाला काही म्हणालो नाही, असे म्हणाला. त्यानंतर आरोपींनी त्याला मानेला धरून घराबाहेर काढत धक्काबुक्की केली. शेख एजाज याने कमरेचे धारदार शस्त्र इरफानच्या गुप्तांगात खूपसले. त्यामुळे इरफान जमिनीवर पडला. त्याच्या गुप्तांगातून रक्तस्राव सुरू झाल्याने त्याचा भाऊ सोहेल याने मित्राच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला परभणी आयसीयू येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अति रक्तस्रावाने तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
याप्रकरणी आरोपी शेख लतीफ शेख याशीन, शेख यजाज शेख लतीफ, शेख साबेर शेख लतिफ, शेख बब्बू शेख लतीफ यांनी ३१ वर्षीय इरफान खान यास संगनमत करून लाथाबुक्क्याने आणि धारदार शस्त्राने मारहाण करून खून केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
