परभणी : कोरड्या अवस्थेतील पिक कापणी प्रयोगाचा अहवाल कंपनीला तातडीने देऊन कारवाई करा असे सांगून पिक विम्याची रक्कम १५ दिवसांत मिळाली पाहिजे, अन्यथा आंदोलन करु असा इशारा आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना त्यांनी निवेदन सादर केले आहे.

परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम – २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पिकविमा काढला. परंतु शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याची रक्कम मिळाली नाही. पिकविमा कंपनीने पीक कापणी धोरणाचा गैरफायदा उचलून पीक कापणी प्रयोग करताना २०२५ मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पाऊस असल्याने जमिनीत पाणी होते, पिकेही ओली होती. यामुळे शासनाने ओल्या पिकांसोबतच कोरड्या पिकांचे देखील पीक कापणी प्रयोग ग्राह्य धरणाच्या सूचना दिल्या होत्या. मात्र याचा कंपनीने याचा गैरफायदा घेत चुकीचा अर्थ काढला, असा आरोप करत दोन अहवाल कसे काय ? हा मुद्दा आमदार पाटील यांनी उपस्थित केला.

परभणी जिल्ह्याचा पीकविमा मंजूर केला नाही. त्यामुळे लाखो शेतकरी पिकविम्याच्या भरपाई पासून वंचित आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पीकविमा कंपनीने तांत्रिक बाब पुढे करत पळवाट काढली आहे. यामुळे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना पीकविमा कंपनीला अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरड्या पीक कापणीचा अहवाल ग्राह्य धरा आणि लवकर पिक विमा भरपाई द्या याबाबत तातडीने अहवाल द्या अशा सूचना आमदार पाटील यांनी केली आहे. अन्यथा पंधरा दिवसात परभणीत तीव्र आंदोलन करू, असा इशारा आमदार पाटील यांनी यावेळी दिला.