परभणी – शहरातील काद्राबाद प्लॉट परिसरातील एका २५ वर्षीय युवकाने शिक्षण घेण्यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये एडव्हाय कंसल्टन्सीमार्फत अमेरीकेतील एका विद्यापीठात प्रवेश निश्चित केला. हायब्रीड एज्युकेशन ऍडमिशनबाबत बोलणी झालेली असताना युनिव्हर्सिटीने कम्पल्सरी ऍडमिशन घ्यावे लागेल, असे तेथे गेल्यानंतर कळवले. ही बाब लक्षात येताच दिलेले पैसे परत मागूनही प्रतिसाद न मिळाल्याने सायबर सेलकडे तक्रार केली. याबाबत मागील एक वर्षापासून केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून विद्यार्थ्यांला पैसे परत मिळाले आहेत.
शहरातील काद्राबाद प्लॉट परिसरातील सय्यद आसिम रऊफ यांनी डिसेंबर २०२४ मध्ये अमेरिकेतील केन्सेस राज्यातील मेसुरी येथे एमएस बिझनेस अनलेटीक्सचे शिक्षण घेण्यासाठी एडवाय या कन्सलटन्सीमार्फत अर्ज केला होता. याकरीता ५ हजार यूएस डॉलर (४ लाख ३३ हजार रूपये) ऑनलाईन पध्दतीने पाठविले होते. हे पैसे त्यांनी एडवाय या कन्सलटन्सीचे मार्फत प्राप्त झालेल्या लिंकद्वारे अविला युनिर्वसिटी मेसुरी यांच्या बँक खात्यावर पाठविले होते. ही रक्कम सय्यद आसिम यांच्या खात्यावरुन विद्यापीठाच्या खात्यावर वर्ग झाली होती.
दरम्यान ही प्रक्रिया होत असतांना कन्सलटन्सीने कोणतेही काम केले नाही. या संदर्भात त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती घेतली. कन्सलटन्सी ज्या महाविद्यालयात सय्यद आसिम यांना प्रवेश देण्याच इच्छुक होती. त्या महाविद्यालयात त्यांना प्रवेश नको होता. यावरून आसिम यांनी प्रवेशासाठी पाठवलेली रक्कम परत देण्याची मागणी केली असता त्यांनी रिटर्न फ्लाईट तिकीटाची माहिती विचारून त्याच वेळी तुमचे पैसे तुमच्या खात्यात परत देतो असे सांगितले. सर्व प्रक्रिया करूनही पैसे परत न मिळाल्याने तब्बल तीन महिने त्यांनी पाठपुरावा केला. शेवटी एप्रिल २०२५ मध्ये सय्यद आसिम यांनी सर्व कागदपत्रांसह या संदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलकडे तक्रार केली.
तक्रार प्राप्त होताच सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बुध्दीराज सुकाळे, पोलिस उपनिरिक्षक आदित्य लाकुळे व सायबर सेलचे पथकाने सबंधित कन्सलटन्सीकडे पाठपुरावा केला. या प्रकरणाची माहिती देत तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कारवाईबद्दल सांगून विद्यार्थ्यांचे पैसे परत करण्यास सांगितले. यावर सुरूवातील कोणतेही उत्तर न देणाऱ्या कन्सलटन्सीने काही दिवसांपूर्वी पैसे परत मिळतील असे आश्वासन दिले. विद्यापीठाकडून या संदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने शेवटी कन्सलटन्सीने विद्यार्थ्यांचे पाच हजार डॉलर परत केले आहेत. सायबर सेलकडून तांत्रिक पुराव्याच्या सहाय्याने करण्यात आलेल्या कारवाईने विद्यार्थीचे पैसे परत मिळाले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बुध्दीराज सुकाळे, पोलिस उपनिरिक्षक आदित्य लाकुळे, अंमलदार बालाजी रेड्डी, पोलीस हवालदार गणेश कौटकर, मोहम्मद शारेख, स्वप्निल पोतदार, सय्यद हिना, रजवी मुर्तुजा यांच्या पथकाने केली.

