परभणी : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती लाखो रुपयांना लुटण्याच्या घटना शहरात लागोपाठ उघडकीस आल्यानंतर दोन सायबर गुन्हेगारांनी पालम तालुक्यातील बनवस येथील शेतकरी दाम्पत्याला तुम्ही दहशतवाद्यांना आर्थिक मदत केली अशी भीती दाखवत त्यांच्याकडून तब्बल १९ लाख ५६ हजार रुपये उकळले. या प्रकरणी चंद्रशेखर माधवराव लांडगे (वय ५२, रा. बनवस) यांच्या फिर्यादीवरून पालम पोलिस ठाण्यात दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडगे यांना गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल आला. कॉलवरील व्यक्तींनी लांडगे यांच्या बँक खात्यातून दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणात तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आले असून, पोलिस कारवाई होऊ शकते, अशी भीती लांडगे व त्यांच्या पत्नीला दाखविण्यात आली.
कारवाई टाळायची असल्यास मोठी रक्कम जमा करावी लागेल, असे सांगून सायबर गुन्हेगारांनी दाम्पत्यावर दबाव आणला. धमकी आणि भीतीमुळे घाबरलेल्या लांडगे दाम्पत्याने आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर ‘आरटीजीएस’द्वारे १९ लाख ५६ हजार रुपये जमा केले. पैसे पाठवल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, या घटनेनंतर तब्बल वर्षभराने त्यांनी पालम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पालम पोलिसांकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात केवळ तीन आठवड्यात ‘डिजिटल अरेस्ट’च्या तीन घटना समोर आल्या. या घटनांमध्ये कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलीस अधिकारी, सीबीआय, ईडी, आरबीआय किंवा अन्य सरकारी यंत्रणेच्या नावाने फोन अथवा व्हिडिओ कॉल करून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवायची आणि कारवाईतून सुटण्यासाठी तुम्ही अमुक एखाद्या खात्यात पैसे जमा करा असे सांगायचे हा प्रकार सातत्याने घडत आहे. शहरात लागोपाठ घडलेल्या या घटनाानंतर आता ग्रामीण भागातही अशा घटना घडल्याचे समोर येत आहे.
