परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी आमदार सुरेश वरपूडकर यांच्याकडून बँकेची सूत्रे आता बोर्डीकर यांच्याकडे आली आहेत. गेल्या दोन, अडीच दशकांपासून आलटून पालटून वरपूडकर व बोर्डीकर यांच्याकडेच बँकेची सत्ता राहत आली आहे. कधी दोघांचे संयुक्त पॅनल तर कधी एकमेकांविरोधात अशा लढती आजवर झाल्या. यावेळी निवडणुकीत दोघांचे संयुक्त पॅनल होते. बँकेच्या उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आज नवनिर्वाचित संचालकांची बैठक पार पडली. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह सर्व संचालक बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या २१ जागापैकी १३ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. आजी-माजी आमदार, त्यांचे कुटुंबीय अशा प्रस्थापित नेत्यांचा या बिनविरोध संचालकांमध्ये समावेश आहे. बँकेचे दीर्घकाळ नेतृत्व करणाऱ्या माजी आमदार सुरेश वरपूडकर व रामप्रसाद बोर्डीकर या दोघांच्या कुटुंबातून यावेळी ५ संचालक बिनविरोध निवडले गेले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील औंढा गटातून राजेश पाटील गोरेगांवकर हे बिनविरोध निवडून आले. तर त्यांच्या पत्नी रुपाली राजेश पाटील या सेनगांव गटातून बिनविरोध निवडून आल्या.परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण १४ पैकी सोसायटी गटातून ९ जागा बिनविरोध आल्या.

परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्य़ांत दबदबा असणाऱ्या राजकीय नेत्यांनी या बँकेवर आपला प्रभाव ठेवला असून आजवर मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशा पदांवरील अनेक राजकीय नेते या बँकेच्या संचालक पदावर निवडून आले आहेत. आताही पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह आमदार राजेश विटेकर, रत्नाकर गुट्टे, सईद खान, राजू नवघरे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपूडकर, सुरेश देशमुख असे परभणी, हिंगोली जिल्ह्यातील सर्व पक्षांचे प्रस्थापित राजकीय नेते या बँकेवर संचालक आहेत.

जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीने मध्यवर्ती बँक हे फार मोठे सत्ता केंद्र असून हजारो शेतकऱ्यांशी संपर्क येत असल्याने जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टिकवण्यासाठी बँकेचा मोठा वाटा मानला जातो. यावेळी विरोधी गटाच्या वतीनेही अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी बऱ्याच राजकीय हालचाली शेवटपर्यंत झाल्या पण बोर्डीकरांनी या सर्व राजकीय डावपेचांमध्ये बाजी मारली. अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात जल्लोष केला. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचे संचालकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.