केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आपली सत्ता अबाधित राहावी म्हणून काँग्रेस मधून एक वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षात गेलेल्या माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांच्या पदरी घोर निराशा आली. बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर वरपुडकरांचा भाजपमध्ये दाखल होण्याचा मनसुबा फसल्याचे स्पष्ट झाले. ठरल्याप्रमाणे झाले नाही असा सूर वरपूडकरांच्या गोटातून उमटला तर नाट्यमय स्थितीत बँकेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचा आनंद बोर्डीकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमधून व्यक्त झाला.
जवळपास एक वर्षापूर्वी माजीमंत्री सुरेश वरपूडकर यांच्यासह त्यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर, स्नूषा प्रेरणा वरपूडकर यांच्यासह त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश केला. वरपूडकरांनी विधानसभा निवडणुकीनंतर हा राजकीय निर्णय घेतला. तत्पूर्वी ते काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते. लोकसभा, विधानसभा निवडणुका होऊन गेल्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. कोणत्याही निवडणुका दृष्टीपथात नसताना केवळ जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्या ताब्यात राहावी, दीर्घकाळ बँक ताब्यात असल्याने भविष्यात कोणताही ससेमिरा मागे लागू नये यासाठी सत्ताधारी पक्षाचे पाठबळ असावे म्हणून वरपूडकर भारतीय जनता पक्षात दाखल झाले.
कोणताही विचार न करता आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असून कार्यकर्त्यांना बळ मिळावे या दृष्टिकोनातून हा प्रवेश असल्याचे वरपूडकर त्यावेळी म्हणाले असले तरीही त्यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशामागे जिल्हा मध्यवर्ती बँक हेच एकमेव कारण होते. गेल्या अडीच दशकांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेत बोर्डीकर व वरपूडकर यांची आलटून पालटून सत्ता आहे. मागील वेळी दोघांचे पक्ष भिन्न होते मात्र आता दोघेही भारतीय जनता पक्षात आहेत. जिल्हा बँकेच्या तेरा संचालकांच्या निवडी बिनविरोध झाल्या मात्र खऱ्या घडामोडी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या दोन दिवस आधी झाल्या. या घडामोडीतूनच अनेक संचालक बोर्डीकर यांच्या संपर्कात आले.
यातल्या काहींचा वरपुडकरांना विरोध होता. पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांचे वरपूडकरांशी राजकीय शत्रुत्व असल्याने त्यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह बोर्डीकरांशी संगनमत केले. हिंगोली जिल्ह्यातील संचालक बोर्डीकरांच्या गोटात आधीच जाऊन मिळाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल पाटील यांनीही बोर्डीकरांना मदत केली. या सर्व राजकीय घडामोडीत वरपूडकर एकाकी पडले. बँकेच्या उपाध्यक्षपदी सईद खान यांची निवड व्हावी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांचे निरोप बैठकीच्या आधी सातत्याने येत होते. तथापि सर्वच घडामोडी खूप पुढे निघून गेल्याने या सर्व नेते मंडळींनी कानमंत्र देऊनही त्याचा कोणताच उपयोग झाला नाही.
जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळ्याप्रकरणी आरोप झालेल्या माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे तब्बल चौदा वर्षानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत पुनरागमन झाले. घोटाळ्यांचे नाहक आरोप करण्यात आले पण या निवडीने बोर्डीकर यांच्या सहकार क्षेत्रातील कामावर शिक्कामोर्तब झाले, खोट्या आरोपांना आपोआपच उत्तर मिळाले अशी प्रतिक्रिया बोर्डीकर यांच्या कन्या तथा पालकमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी या निवडीनंतर दिली. आपल्या वडिलांच्या या निवडीसाठी त्यांची भूमिकाही निर्णायक राहिली.
