परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल आज सोमवारी (दि. २०) जाहीर झाला. अटीतटीच्या या निवडणुकीत आमदार सईद खान, आमदार राजू नवघरे यांच्यासहित नंदकुमार डाखोरे, आकाश चोखट, राजामती मुटकुळे, शोभा बोबडे यांनी विजय मिळविला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या २१ जागापैकी १३ जागांच्या निवडणूका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत.परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण १४ पैकी सोसायटी गटातून ९ जागा बिनविरोध आल्या आहेत.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी रविवारी (दि.१९) जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले होते. तर ९८.२१ टक्के एवढे विक्रमी मतदान झाले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी येथील कल्याण मंडपम परिसरात निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश काकडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बालासाहेब नांदापूरकर, एम. यू. यादव यांच्या मार्गदर्शनात ७ टेबलांवर प्रत्यक्ष मतमोजणीची करण्यात आली.

या निवडणुकीत प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्था प्रवर्गातून नंदकुमार लक्ष्मणराव डाखोरे विजयी झाले आहेत. त्यांनी तुळशीराम यशवंतराव बोबडे यांचा पराभव केला. मानवत गटातून आकाश पंडितराव चोखट विजय झाले आहेत. त्यांनी अमोल गंगाधर कदम यांचा पराभव केला. हिंगोली गटातून राजामती शिवाजी मुटकुळे विजयी झाल्या आहेत. त्यांनी रमेश विठ्ठलराव शिंदे यांचा पराभव केला. वसमत गटातून आमदार चंद्रकांत रमाकांतराव नवघरे विजयी झाले असून त्यांनी तुषार देवराव जाधव यांचा सपशेल पराभव केला. कळमनुरी तालुक्यातून अभय अरुणराव सावंत विजयी झाले आहेत. त्यांनी बालासाहेब मगर, दत्तराव कदम यांचा पराभव केला.

इतर शेती संस्था गटातून आमदार सईद खान २९० मते घेऊन विजय झाले आहेत. त्यांनी विजय रावसाहेब जामकर यांचा अवघ्या तीन मतांनी पराभव केला. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती गटातून शोभा हनुमंतराव बोबडे १ हजार २१६ मते घेऊन विजयी झाल्या आहेत. या गटातून प्रशास चंद्रशेखर ठाकूर १२, तुकाराम धोंडेबा रुमाले ९, यशवंत संपतराव वाटोजे ११, संजय ज्ञानोबा सारणीकर ३ अशी मते मिळाली आहेत. विमुक्त जाती – विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून दत्तात्रय रामभाऊ मायंदळे १ हाजर ६६ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी स्वराजसिंह परिहार यांचा पराभव केला. परिहार यांनी ३४८ मते मिळविली. तर अभय बालासाहेब कुंडगीर ५, सुनंदा अशोकराव फलके ९, बळीराम रामचंद्र सोरेकर यांनी ३ मते मिळविली.

यापूर्वी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वरपूडकर, रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी आमदार सुरेश देशमुख, तुषार दुधाटे, पठाण मेहराज खान, राजेश पाटील गोरेगावकर, रूपाली राजेश पाटील गोरेगावकर, महिला गटातून प्रेरणा समशेर वरपूडकर, भावना सचिन मुंगसे- बोर्डीकर इतर मागास प्रवर्गातून भगवानराव वाघमारे हे सदस्य बिनविरोध निवडल्या गेले आहेत.