परभणी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या २१ जागापैकी १३ जागांच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. आजी-माजी आमदार, त्यांचे कुटुंबीय अशा प्रस्थापित नेत्यांचा या बिनविरोध संचालकांमध्ये समावेश असून अनेक कार्यकर्त्यांना मात्र निवडणुकीच्या मैदानात आता स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे. बँकेचे दीर्घकाळ नेतृत्व करणाऱ्या माजी आमदार सुरेश वरपूडकर व रामप्रसाद बोर्डीकर या दोघांच्या कुटुंबातून ५ संचालक बिनविरोध निवडले गेले आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँक हे जिल्ह्याच्या राजकारणातले मोठे शक्तीकेंद्र मानले जाते. बँकेचे बहुतांश संचालक हे आजी माजी आमदार असतात. संचालकपदाच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. आपापला मार्ग मोकळा करण्यासाठी आजी-माजी आमदारांनी प्रयत्नांची शिकस्त केली. या बँकेच्या प्राथमिक कृषि पतपुरवठा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघात परभणी गटातून बँकेचे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार सुरेश वरपुडकर हे अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवडून आले आहेत. या गटातून त्यांचे चिरंजीव समशेर वरपुडकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज होता. समशेर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जिंतूर गटातून बँकेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे ही बिनविरोध निवडून आले. सेलू गटातून जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर या बिनविरोध निवडून आल्या. या गटातून राजेंद्र लहाणे यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.
पाथरी गटातून आमदार सईद खान यांचे बंधु पठाण मेहराज खान शेरगुल खान हे बिनविरोध निवडून आले. गंगाखेड गटातून आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे अंकेश भगवान सानप यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बिनविरोध निवडून आले तर सोनपेठ गटातून आमदार राजेश विटेकर हे बिनविरोध निवडून आले. येथून विठ्ठलराव सूर्यवंशी, विद्या धोंडगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पालम गटातून एकमेव अर्ज असल्याने तुषार दुधाटे गोळेगांवकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील औंढा गटातून राजेश पाटील गोरेगांवकर हे बिनविरोध निवडून आले. तर त्यांच्या पत्नी रुपाली राजेश पाटील या सेनगांव गटातून बिनविरोध निवडून आल्या आहेत.
परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण १४ पैकी सोसायटी गटातून ९ जागा बिनविरोध आल्या आहेत. त्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील पूर्णा व मानवत तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत, हिंगोली व कळमनुरी या पाच गटात निवडणूक होणार आहे. कृषि पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया मतदारसंघातून संतोष बोबडे यांच्या पाठोपाठ अभिजित पारवे, राजेश काळे या तिघांनी आपआपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे माजी आमदार सुरेश देशमुख यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. महिला गटातून प्रेरणा समशेर वरपुडकर व भावना सचिन बोर्डीकर-मुंगसे या दोघी बिनविरोध निवडून आल्या आहेत. इतर मागास प्रवर्ग गटातून माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे हे बिनविरोध निवडून आले आहे. इतर शेती संस्था मतदारसंघात सईद खान विरुध्द विजय जामकर लढत होणार आहे तर अनुसूचित जाती,जमाती मतदारसंघ, विमुक्त जाती भटक्या जमाती विविध मागास प्रवर्ग या मतदारसंघातही मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
