परभणी: येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत ई-मेल ऍड्रेसवर न्यायालय बॉम्बने उडविण्याचा मेल प्राप्त झाल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. या मेलची अधिकृत माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस बॉम्ब शोधक तसेच श्वान पथकासह सर्व यंत्रणा न्यायालय परिसरात तातडीने दाखल झाली. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही वेळातच न्यायालय परिसर रिकामा करून बंदोबस्त तैनात केला.

आज सोमवारी(दि.२) न्यायालयाचे कामकाज नियमितपणे सुरू झाले होते. इमारतीच्या आवारातही नेहमीप्रमाणे गर्दी होती. आज दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयास अधिकृत मेलवर एक निनावी ई-मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये परभणी जिल्हा न्यायालयाची इमारत बॉम्बने उडविण्याचा उल्लेख करण्यात आला. यामुळे न्यायव्यवस्थेतील न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, वकील, पक्षकार यांच्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी न्यायालयाच्या इमारतीतील सर्वांना बाहेर काढून इमारत रिकामी केली.

दरम्यान न्यायालय परिसरात अग्निशमन दलास तात्काळ पाचारण करण्यात आले. तसेच पोलिसांचे बॉम्ब शोधक पथक, श्वानपथक आदीसह पोलीस बंदोबस्त मोठ्या संख्येने तैनात करण्यात आला. काही वेळानंतर ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. बराच काळ या घटनेने परिसरात खळबळ उडाली त्यानंतर मात्र वातावरण पूर्ववत झाले.