परभणी : साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात होण्याआधी आणि खरीप हंगाम आटोपल्यानंतर ग्रामीण भागातून रोजगारासाठी स्थलांतर होते. दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मजूर कामासाठी गावाबाहेर पडू लागतात या नेहमीच्या चित्राला यंदा दुष्काळाने छेद दिला असून दसरा- दिवाळी आधीच खेड्यापाड्यातून मजुरांचे स्थलांतर व्हायला प्रारंभ झाला आहे.
या दिवसात सोयाबीन काढणे आणि कापूस वेचणीच्या कामाला वेग आलेला असतो. मात्र मराठवाड्यातील ही दोन्ही नगदी पिके हातची गेल्याने मजुरांना कामच उरलेले नाही. सोयाबीन काढणीसाठी एकरी ४ हजार रुपये तर कापूस वेचणीसाठी १० रुपये प्रति किलो अशी मजुरी आहे. या कामांच्या निमित्ताने किमान महिनाभर शेतमजुरांच्या हाती पैसा खेळतो. या मजुरीच्या पैशावर कुटुंबाचे बरेच नियोजन असते. गावात आता रोजगारच उपलब्ध नसल्याने मजुरांवर स्थलांतराची पाळी आली आहे. विशेषतः बालाघाट व अजिंठाच्या डोंगररांगांमधील गावात हे प्रमाण अधिक जाणवत आहे.
रोजगारासाठी छत्रपती संभाजीनगर, पुणे, आळंदी, नाशिक या ठिकाणी लोक जात आहेत. सोनपेठ (जिल्हा परभणी ) या ठिकाणाहून पुण्यासाठी दररोज सायंकाळनंतर आठ खाजगी बसेस जातात. त्यात आता प्रवाशांमध्ये स्थलांतरित मजुरांचे प्रमाण दिसू लागले आहे. परभणीच्या रेल्वे स्थानकावर सुद्धा रात्री उशिराच्या पॅसेंजर गाड्यांनी जाणाऱ्या मजुरांचे प्रमाण अधिक असून आपापल्या गावावरून मिळेल त्या वाहनाने हे मजूर कुटुंबकबिल्यासह सायंकाळी रेल्वे स्थानकावर पोहोचतात येथून पुणे, नाशिककडे जाणाऱ्या मजुरांची संख्या अधिक आहे.
सेलू तालुक्यातील तांदुळवाडी या गावातून गेल्या आठवड्यात चार पाच कुटुंबे स्थलांतरित झाली. आबासाहेब अंकुश हरकळ (वय ४५) हे आपली पत्नी आणि मुलासह रोजगारासाठी छत्रपती संभाजीनगरला गेले. त्यांचे वृद्ध आई-वडील मात्र गावातच आहेत. हरकळ कुटुंबाकडे तीन एकर जमीन आहे मात्र त्या जमिनीच्या तुकड्यावर त्यांचे पोट भरत नाही. शेतातले सोयाबीन करपले आणि हळदही करपली त्यामुळे शहराचा रस्ता धरल्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच उरलेला नाही.
गावात रोजगार हमीची कामे सुरू व्हावीत म्हणून काही ठिकाणी मजूर आग्रह धरू लागले आहेत. आज रविवारी (दि.४) वालूर या गावी मजुरांची बैठक झाली. आम्हाला तात्काळ रोहयोच्या माध्यमातून काम द्या अन्यथा काम नसेल तर भत्ता द्या अशी मागणी करणारे अर्ज आम्ही प्रशासनाला देणार आहोत असे अरुण हरकळ यांनी सांगितले. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पालम, सोनपेठ या तालुक्यातून होणारे स्थलांतर अधिक आहे. मजुरांच्या स्थलांतरामुळे संबंधित कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, वयोवृद्धांची देखभाल असे प्रश्न निर्माण झाले आहेत. एरवी दसरा दिवाळीनंतर होणारे स्थलांतर त्याआधीच होण्याचे हे चित्र पहिल्यांदाच दिसू लागले आहे.
मजूर गावाबाहेर का पडत आहेत ?
दुष्काळी परिस्थितीत पिके गेल्याने कापूस वेचणी, सोयाबीन काढणी ही कामेच उरलेली नाहीत.
पावसाविषयीच्या अनिश्चिततेने रब्बी हंगामाची कोणतीही शाश्वती नाही.
उसाचे उत्पादन घटल्याने आणि साखर कारखाने चालण्याचा कालावधी जवळपास निम्म्यावर आल्याने दरवर्षी हंगामाआधी जी उचल घेतली जाते ती सुद्धा फिटण्याची खात्री नाही.
