परभणी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री व पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी यांचे भरभरून कौतुक केले. मोदी यांच्या नेतृत्वात देश २०१४ पासून विकासाच्या मार्गावर आरूढ झाला असून देशातील १४० कोटी जनतेच्या विकासाचा अहोरात्र ध्यास पंतप्रधानांनी घेतला घेतला आहे. वैमानिक स्मित मछार यांनी १७४ प्रवासी असलेले विमान हायजॅक होण्यापासून वाचवल्यानंतर सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले मात्र विरोधकांना अजूनही हे अभिनंदन करण्याची सुचले नाही. कोणत्याही आंदोलनाचे राजकारण करायचे हीच सध्या विरोधकांची पद्धत असल्याची टीका यावेळी शिंदे यांनी केली.
येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षाच्या सेवापूर्ती अभियानाच्या निमित्ताने आयोजित दुष्काळग्रस्तांना मदतीचे वाटप आज बुधवारी (दि.७) शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप तर महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, आमदार सईद खान, माजी खासदार सुरेश जाधव, शिवसेनेचे परभणी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम, माजी जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे, गंगाप्रसाद आणेराव, माजी महापौर प्रताप देशमुख, महिला आघाडीप्रमुख सखुबाई लटपटे आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, यंदा पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिके गेली, अशा संकटाच्या परिस्थितीत केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, कुठलेही टोकाचे पाऊल उचलू नये. राज्यभरात विशेषत: मराठवाड्यात अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती उद्भवली असून संकटाच्या या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क असून कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली.
दरम्यान शिवसैनिकांनी मदतीसाठी तत्पर राहून शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी सदैव तयार राहावे, असे आवाहन करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, राज्य सरकारची नमो किसान योजना अशा विविध योजनांची माहिती यावेळी त्यांनी दिली. राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नसल्याचा पुनरुचार केला.परभणीच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून येथील क्रीडासंकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, रस्ते आणि नव्या औद्योगिक वसाहतीसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. प्रास्ताविकात खासदार संजय जाधव यांनी परभणी जिल्ह्यातील विकासाचे विविध प्रश्न मांडले.
