परभणी: ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीत जिल्ह्यातील २६ हजार ६३५ शेतकऱ्यांच्या खात्यावर २६४ कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम कर्जखात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हयातील आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांपैकी ५२ हजार ५८३ पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रुपये ४०८ कोटी एवढी रक्कम वितरित झालेली आहे.
आज गुरुवारी (दि.१) तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये परभणी जिल्हयातील एकूण २६ हजार ६३५ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये २६४ कोटी ८५ लाख रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ७९ हजार २१८ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रुपये ६७२.९१ कोटी इतकी रक्कम जमा झाली आहे.
उर्वरित आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांची रक्कमही लवकरच वितरित होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजुनही आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे.
जिल्हयात एकूण १ लाख६० हजार ७६९ शेतकरी सभासदापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या, परभणीतील २ हजार ९८५ व राष्ट्रीयकृत बँकेचे १ लाख ५७ हजार ७८४ शेतकऱ्याची माहिती पोर्टलवर अपलोड केलेली असून प्राप्त यादीमध्ये ७९ हजार ८५५ शेतकऱ्यांना एकूण रक्कम ५८२ कोटी रूपयांचा लाभ मिळणार आहे.
दि. ७ ऑगस्ट रोजी शासनाने सदर योजनेच्या पहिल्या यादीत परभणी जिल्ह्यातील ७ हजार ८७० शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ६० कोटी ४ लाख १० हजार ९६६ रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये जमा केली आहे. तर दि. २४ ऑगस्ट रोजी शासनाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत परभणी जिल्ह्यातील ४४ हजार ७१३ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३४८ कोटी २ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे. असे एकूण ५२ हजार ५८३ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यामध्ये ४०८ कोटी रुपयांची रक्कम यापूर्वी जमा झाली आहे.
