परभणी : गोदावरी नदीपात्रात अवैध वाळूउपसा सुरू असून अवैध वाळूउपसा करणाऱ्या ठेकेदारांना तलाठी व मंडळ निरीक्षक पाठीशी घालत आहेत. वाळू माफीयांचे हितसंबंध राखणाऱ्या महातपूरी व खळी येथील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी गंगाखेड तालुक्यातील महातपुरी परिसरातील गोदावरी नदीपात्रात सोमवारी (दि.४) जलसमाधी आंदोलन करण्यात आले. दुपारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या पंचनामा व लेखी आश्वासनाने आंदोलन स्थगित करण्यात आले.

गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, खळी हद्दीत अवैध व नियमबाह्य पद्धतीने कंत्राटदाराकडून वाळूउपसा होत असून त्यासाठी अजस्त्र यंत्राचा वापर केला जात आहे. मोठे पोकलेन व बोटी लावून खोल पाण्यातून वाळू चोरी व उपसा केला जात आहे. वेळेचे निर्बंध डावलून रात्रंदिवस वाळूउपसा चालू आहे. पर्यावरण विभागाने घालून दिलेले नियम राजरोसपणे मोडले जात आहे,  असा आरोप करत स्थानिक कार्यकर्त्यांनी हे जलसमाधी आंदोलन केले. या अवैध वाळू उपसा प्रकरणी वारंवार  खळी व महातपुरीच्या तलाठी  तसेच मंडळाधिकारी यांच्याकडे तक्रार करून त्यांना पुरावे दिले तरीही कोणतीच कार्यवाही होत नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

चिंचटाकळी रेतीघाटातून नियमबाह्य वाळू वाहतूक केली जात असुन खळी ओढा पूलास भेगा पडल्याने कोणत्याही क्षणी पूल कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे खळी, चिंचटाकळी, गौंडगाव, मैराळ सांवगी रस्ता कायमस्वरूपी बंद होऊन मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल असे कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मागील ५ मार्च  रोजी खळी ग्रामस्थांच्या वतीने वाळूचोरी व प्रशासनाच्या उदासिनतेविरुद्ध गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी स्थळपाहणी पंचनामा करून कारवाईचे आश्वासन देण्यात आले. पण आजतागायत आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नाही. पर्यावरणाचा -हास होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, परिसरातील विहीर व बोअर कोरडे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे गावकऱ्यांना दूषित पाणी, पाणीटंचाई तथा रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या आंदोलनात किसानसभेचे जिल्हा सेक्रेटरी ओंकार पवार, बाबासाहेब कुगे, वामन ढोबळे, अनिल देशमुख, शेषराव सुरवसे, प्रदिप गौरशेटे, उत्तम दसवंते, मावली करवर यांनी सहभाग नोंदवला. यावेळी नायब तहसीलदार अहमद अजिम, मंडळाधिकारी महातपुरी, गंगाखेड मंडळाधिकारी हजर होते. तसेच  मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी ठेवण्यात आला होता.