परभणी : कुष्ठरोग कार्यालयातील कनिष्ठ लिपिकासह तत्कालीन आणि विद्यमान आहरण व संवितरण अधिकार्‍यांनी संगनमत करून शासनाची १२ लाख ८० हजार १३६ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी (दि. 13) नवा मोंढा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, जिल्हा सहाय्यक संचालक आरोग्यसेवा, कुष्ठरोग कार्यालयात कार्यरत असलेले कनिष्ठ लिपिक वीरेंद्र मोरेश्वर सुतवणे, तत्कालीन आहरण व संवितरण अधिकारी डॉ. विद्या भोजराज सरपे आणि विद्यमान आहरण व संवितरण अधिकारी डॉ. पंढरीनाथ हरिभाऊ लक्कमवार यांच्या कार्यकाळात हा प्रकार घडला. लेखा व कोषागार कार्यालयातून एरिअर्सची अधिकची रक्कम काढण्यात आली. २९ मे २०२० रोजी ३ लाख ३१ हजार ८६० रुपये, ४ जून २०२२ रोजी ३ लाख ३१ हजार ८६० रुपये, ३ मे २०२४ रोजी ३ लाख ३१ हजार ८६० रुपये आणि २५ ऑक्टोबर २०२४ रोजी २ लाख ८४ हजार ५५६ रुपये अशी एकूण १२ लाख ८० हजार १३६ रुपयांची रक्कम शासनाच्या खात्यात जमा होण्याऐवजी कनिष्ठ लिपिक वीरेंद्र सुतवणे यांच्या वैयक्तिक खात्यावर वळती करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची दखल घेत उपसंचालक आरोग्यसेवा, छत्रपती संभाजीनगर यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन करून चौकशी केली. चौकशीत कनिष्ठ लिपिक वीरेंद्र सुतवणे यांनी वैयक्तिक लाभासाठी चार वेळा शासनाची अधिकची रक्कम स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर वळती केल्याचे निष्पन्न झाले. तसेच तत्कालीन आहरण व संवितरण अधिकारी डॉ. विद्या सरपे कुलदीपक आणि विद्यमान आहरण व संवितरण अधिकारी डॉ. पंढरीनाथ लक्कमवार यांनी कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणा केल्याचे चौकशीत आढळून आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

शासनाची १२ लाख ८० हजार १३६ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वीरेंद्र सुतवणे, डॉ. विद्या सरपे कुलदीपक आणि डॉ. पंढरीनाथ लक्कमवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमल शिंदे करीत आहेत.