परभणी: गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तापमान काही दिवस ४० अंशापेक्षा कमी नोंदले गेले असले तरी आता पुन्हा तापमानात वाढ झाली असून आज सोमवारी (दि.११) तापमानाचा पारा ४२.७ अंशावर जाऊन पोहोचला. दुपारनंतर वातावरण ढगाळ झाले तरी उकाडा मात्र कायम जाणवत होता. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी होते. शनिवारी ३७.७ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदले गेले तर रविवारी या तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
परभणीचे रविवारचे तापमान ४१.५ अंश सेल्सिअस एवढे होते. आज त्यात वाढ झाली. सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता. दुपारी उन्हाच्या तीव्रतेत आणखी वाढ झाली. सध्या कडक ऊन आणि ढगाळ वातावरण असा लपंडाव पाहायला मिळत आहे मात्र उन्हामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना उन्हाचा त्रास अधिक जाणवत आहे.
सध्या शेतात मशागतीची कामे सुरू असल्याने दुपारच्या कडाक्याच्या उन्हाचा फटका मजुरांना बसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे शेतातील कामाच्या वेळा बदलल्या आहेत. दुपारचे तीन ते चार तास शेतातल्या कामांवर या तापमानाचा परिणाम होताना दिसून येत आहे. सकाळच्या वेळेत व संध्याकाळच्या वेळेत शेतातील कामांनी वेग घेतला आहे. त्यातच जिल्ह्याच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाल्याने फळबागांनाही मोठा फटका बसला.
उन्हाच्या तीव्रतेने फळझाडांना पाण्याचा ताण सोसावा लागत आहे. त्याचवेळी वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने आंबा या पिकावरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाचा आंब्यासह पपई, हळद या पिकांनाही फटका बसला. जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाने खाली पडलेल्या फळ पिकांना खरेदीदारांकडून कमी भाव मिळत आहे.
दरम्यान जिल्ह्यात मान्सून दाखल होईपर्यंत तापमानात चढउतार जरी झाले तरी उन्हाचा तडाखा कायम राहू शकतो आणि सध्याच्या तापमानात बदल होऊ शकतो असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.
