परभणी : उबाठा शिवसेनेने परभणीत मुस्लिम महापौर दिल्यानंतर टीका करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आता परभणी हिंगोली विधान परिषदेसाठी सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. ‘खान हवा की बाण’ असा आजवर प्रचार करणाऱ्या शिवसेनेत आता खान आणि बाण सोबतच आहेत हे यानिमित्ताने स्पष्ट झाले. सईद खान हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून पाथरी विधानसभा निवडणुकीत धनुष्यबाणाच्या चिन्हावर त्यांचा पराभव झाला होता.
मुस्लिम मतांच्या विरोधात हिंदू मतांचे ध्रुवीकरण करत सेनेने आजवर परभणी विधानसभेला विजय मिळवला. मागच्या सर्व निवडणुकीत ‘खान हवा की बाण’ यावर शिवसेनेच्या प्रचाराचा भर असायचा. त्यातून होणाऱ्या मतांच्या ध्रुवीकरणात शिवसेना बाजी मारायची. परभणी शहर हे निर्णायक अशा मुस्लीम मतांसाठी प्रसिद्ध आहे. आजवरच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सातत्याने मुस्लीम मतांचा विचार करून या मतदारसंघात बहुतांश वेळा मुस्लीम समाजाला उमेदवारी दिली. काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवार रिंगणात असल्यावर शिवसेनेकडून धार्मिक रंग देत मतांचे ध्रुवीकरण कसे होईल याची खबरदारी घेतली जात असे. त्यातूनच ‘खान हवा की बाण’ अशा प्रचाराचा उदय झाला.
१९९० पासून सेनेचा भगवा परभणी मतदारसंघात सातत्याने फडकत आहे. मुस्लीमबहुल असलेल्या या मतदारसंघात मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाल्यानंतर सेनेला विजय सोपा जात असे. सेनेचे उमेदवारही थेट तसा प्रचार करत. हळूहळू सेनेने या मतदारसंघावर आपला प्रभाव कायम ठेवला आणि ‘धनुष्यबाण’ हे सेनेचे चिन्ह हिंदुत्ववादी मतदारांच्या मनावर ठसले.
धनुष्यबाण या चिन्हावरचा उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा अधिकार संपुष्टात आल्यानंतर परभणीत मोठे स्थित्यंतर घडले. ‘खान हवा की बाण’ असे म्हणत धार्मिक ध्रुवीकरण करून विजयाकडे झेपावणाऱ्या शिवसेनेच्या बाबतीत परभणी मतदार संघातले गणित गेल्या निवडणुकांपासून बदलले आहे. धार्मिक ध्रुवीकरण करायचे आणि राजकीय लाभ मिळवायचा अशी शिवसेनेची योजना असायची. त्यात सेना अनेकवार यशस्वी झाली मात्र गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतांची बेरीज करून विजय मिळवणाऱ्या शिवसेनेसाठी धनुष्यबाणाचे राजकीय संदर्भ पार बदलून गेले.
ज्या मुस्लिम मतांची भीती दाखवत शिवसेनेने परभणीत आजवर ‘खान हवा की बाण’ असा प्रचार केला त्याच शिवसेनेने महापौरपदी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देऊन आपला राजकीय पवित्रा पूर्णपणे बदलला. उबाठा शिवसेनेने सय्यद इकबाल यांना महापौरपदी संधी दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली होती.
“२०१९ ला त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले होते. आता परभणीत त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला”, अशी उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे यांनी टीका केली होती. शिंदे यांच्या टीकेवर उत्तर देताना संजय राऊत यांनी आमचे अनेक पदाधिकारी मुस्लीम असून ते वर्षानुवर्ष काम करत आहेत. ते मुस्लीम आहेत, म्हणून त्यांना पदापासून दूर ठेवणार का? तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावान मुसलमान परवडला.” अशी टीका केली होती.
असा आहे ‘खान बाण’चा इतिहास…
परभणी मतदारसंघात १९९० मध्ये सेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर हनुमंत बोबडे विजयी झाले. काँग्रेसने शमीम अहमद खान यांना उमेदवारी दिली होती, तर जनता दलाकडून विजय गव्हाणे रिंगणात होते. खान व गव्हाणे या दोघांनी राजकीय भाषेत ‘धर्मनिरपेक्ष’ मतांचे विभाजन केले. त्या वेळी बोबडे यांनी खान यांच्याविरुद्ध तब्बल १२ हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला. गव्हाणे व खान यांना मिळालेली मते ६५ हजार होती, तर बोबडे यांनी ४९ हजार मते मिळवली. या निवडणुकीपासून सेनेने हा प्रचार सुरू केला असे बोलले जाते.
