परभणी : महाविकास आघाडीच्या वतीने परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जागा उबाठा शिवसेनेला सोडली जाणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर आता या मतदारसंघात उबाठा शिवसेनेने पक्षाचे महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन शिवसेनेतच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी अद्याप शिंदे सेनेची उमेदवारी जाहीर झालेली नाही. दोन्ही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात राहणार असले तरी आणखी एका वजनदार उमेदवाराच्या शोधात सध्या मतदार आहेत. सोमवार (दि.१ जून) ही उमेदवारी दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने अवघ्या काही तासानंतर लढतीचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

महायुतीत परभणी हिंगोलीची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटली आहे. भाजप व राष्ट्रवादी अजित पवार या दोन्ही पक्षांच्या वतीने काही नावांची चर्चा झाली असली तरी या चर्चेला आता पूर्णविराम मिळू लागला आहे. त्यामुळे परभणी हिंगोली विधान परिषदेची लढत ही दोन शिवसेनेत होणार हेही आता स्पष्ट झाले आहे. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या ठिकाणचे खासदार व आमदार हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले असले तरी गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू आहेत. खासदार जाधव यांनी मनाने कधीच उबाठा शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यात जमा आहे. ते पक्षाच्या कोणत्याही बैठकीला अथवा कार्यक्रमाला नाहीत. खासदार जाधव यांची पावले ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दिशेने आहेत. शिंदे यांना या निमित्ताने एक अनुभवी स्थानिक नेता मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेना विधान परिषदेसाठी कोणाला रिंगणात उतरवणार याबाबतची उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत कायम आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणीत अकोल्याचे विप्लव बाजोरिया आठ वर्षांपूर्वी आमदार झाले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांचा पराभव केला होता. बाजोरिया यांच्या विजयापेक्षा सुरेश देशमुख यांच्या पराभवाची त्यावेळी चर्चा झाली होती. देशमुख यांचा पराभव झालाच कसा या प्रश्नाचे कोडे अजूनही उलगडलेले नाही.यावेळी शिंदे सेनेकडून पुन्हा बाजोरिया यांची चर्चा सुरू आहे. परभणी हिंगोली जिल्ह्याचा विचार करू जाता महायुतीचे सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्त आहेत. आकड्यांचे बहुमत महायुतीच्या बाजूने आहे तरीही या निवडणुकीत मतदार आणि राजकीय पक्षांचे विचार याचा फारसा संबंध उरत नाही.

गेल्यावेळी या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांची संख्या २९७ एवढी असताना काँग्रेसचे उमेदवार सुरेश देशमुख यांना २२१ मते मिळाली होती. केवळ मतांची बेरीज यापेक्षा धनशक्तीचे पारडे ज्या बाजूने जड त्या बाजूने या निवडणुकीचा निकाल फिरतो. गेल्या काही दिवसांपासून शिंदे सेनेच्या वर्तुळात पुन्हा विप्लव बाजोरिया यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.गेल्यावेळी निवडून गेलेले बाजोरिया पुन्हा इकडे फिरकलेच नाहीत. हा त्यांच्या वरचा प्रमुख आक्षेप आहे. पाथरीचे सईद खान यांच्याही नावाची शिंदे शिवसेनेकडून जोरदार चर्चा सुरू आहे. बाजोरिया पुन्हा रिंगणात उतरले तर त्यांच्या तोडीस तोड आणखी एखादा उमेदवार निवडणुकीत उतरवावा यासाठी मतदारांनी देव पाण्यात ठेवले आहेत. दरम्यान उमेदवारी दाखल करण्याची मुदत जवळ आल्याने या लढतीचे अंतिम चित्र अवघ्या काही तासात स्पष्ट होणार आहे.